Sai Lokur : अभिनेत्री सई लोकूर बिग बॉस मराठमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. मागील वर्षी तिने मुलीला जन्म दिला. सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. मात्र आई झाल्यानंतर अनेकदा तिला वजन वाढल्यामुळे ट्रोल केले जाते. नुकतेच सईने अभिनेत्री मेघा धाडे व शर्मिष्ठा राऊतचे काही फोटो शेअर केले होते. ज्यानंतर तिच्यावर वाढलेल्या वजनामुळे टीका केली जाऊ लागली. मात्र सईने देखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
सई लोकूरची पोस्ट –
सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले, “ज्या स्त्रीने नुकतेच एका बाळाला जन्म दिला आहे, त्या स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे यावर मला विश्वासच बसत नाही. त्या स्त्रीला तिचे वजन कमी करण्यासाठी आणि तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ द्या. सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे, जिथे तुमच्या शरीराचे सहा थर कापले जातात. या शस्त्रक्रियेनंतर खूप बंधने येतात. तुम्ही जड उचलू शकत नाही, वाकू शकत नाही, तुमच्या स्तनपानामुळे तुम्ही आहारही घेऊ शकत नाही.”
सईने पुढे लिहिले, “एका बाळाला जन्म दिल्यानंतर तुमचं शरीर अनेक व्यथांमधून जात असते आणि या काळात एका स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे म्हणजे लज्जास्पद आहे. या प्रतिक्रियांनी मला आश्चर्य वाटले, पण देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, कारण मला तुमची खूप दया येते. जर लोक थोडे आणखी समजूतदार, दयाळू राहिले तर हे जग त्यांना राहण्यासाठी एक चांगले ठिकाण असेल.” सईची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
दरम्यान, सईने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आई झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. सईने नोव्हेंबर 2020 मध्ये तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली होती. सईने बंगाली आणि मराठी पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर आता दोन वर्षांनी सई आणि तीर्थदीप आई-बाबा झाले आहेत.
सईच्या कामबद्दल सांगायचे झाले तर, तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ती पाहायला मिळाली.