मुंबई – मागील पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या राजकारणात भाजपनेते किरीट सोमय्या आणि वकील गुणरत्न सदावर्ते सतत चर्चेत आहेत. सरकारला अडचणीत आणणारे दोन्ही नेते आता स्वत:च अडचणीत आले आहेत. त्यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याही अडचणी वाढणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बत्काराचे आरोप करत चित्रा वाघ यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पीडित तरुणीच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं होतं. मात्र आता या प्रकरणाला वेगळच वळण मिळालं आहे.
कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यासाठी चित्रा वाघ यांनी भाग पाडल्याचं तरुणीने म्हटलं आहे. आता या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
तरुणीने म्हटलं की, चित्र वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकत आरोप करण्यास सांगितलं. माझ्या मोबाईलमधून एका ऍपच्या मदतीने मेसेज पाठविण्यात आले. तसेच चित्रा वाघ यांनी आपल्याला गोव्यात डांबून ठेवले होते, असा गंभीर आरोप तरुणीने केला आहे.
दरम्यान भाजपच्या एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिलं आहे. हे पत्र पोलिसांना देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचं तरुणीने वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं.