नवी दिल्ली – रशियाकडून घेतल्या जाणाऱ्या तेलावर आंशिक स्वरूपात प्रतिबंध लावण्याचा निर्णय युरोपीय संघाने घेतला आहे. आता जर त्यांनी निर्बंधाची व्याप्ती आणखी वाढवली तर रशियाला आपल्या तेलाच्या विक्रीसाठी आशियातील देशांवरच निर्भर राहावे लागेल. तसे झाले तर त्यांना केवळ भारत आणि चीन हे दोनच मोठे खरेदीदार देश उपलब्ध असतील. याचा सार असा की रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचे आगामी काळात भारतावरचे अवलंबित्व अधिक वाढणार असल्याचा दावा ब्लूमबर्गने केला आहे.
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार जर युरोपीय संघाने रशियाच्या कच्च्या तेलावर निर्बंध घातले तर रशियला वार्षिक 10 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. अर्थात युरोपात रशियाचे युराल्स क्रूड हे कच्चे तेल फारच लोकप्रीय आहे. त्यामुळे त्याच्या विक्रीसाठी रशियाला नव्या खरेदीदाराची खचितच गरज पडण्याची शक्यता आहे. मात्र आशियात त्याला तितकी मागणी असण्याची शक्यता नाही.
त्याचे कारण याच्या शुध्दीकरणासाठी जी प्रक्रिया करणे आवश्यक आहे, ती यंत्रणा श्रीलंका अथवा बांगलादेश आदी देशांकडे नाही. केवळ चीन आणि भारताकडेच यूरालवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच हे देश या तेलाच्या अतिरिक्त बॅरल्स खरेदी करू शकतात. चीनमधील शांघाय येथे बराच काळ लॉकडाऊन होते. ते आता लॉकडाऊनमधून बाहेर पडते आहे.
त्यामुळे चीन या कच्च्या रशियन तेलाच्या अतिरिक्त साठ्याच्या खरेदीचा विचार करू शकतो. पण चीन आणि भारत या दोन्ही देशांना काही मर्यादाही आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपने जेव्हा हे तेल नाकारले तेव्हापासून अगोदरच या दोन देशांनी विक्रमी स्तरावर तेल खरेदी चालू ठेवली आहे. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त ते तेल खरेदी करू शकणार नाहीत.