मॉस्को – रशियातील विरोधी नेते ऍलेक्सी नवालनी यांच्या सुटकेसाठी रविवारी हजारो नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. या मोर्चेकऱ्यांविरोधात सरकारने कठोर पावले उचलली असून आतापर्यंत 5 हजार जणांना अटक करण्यात आली आहे. मोर्च्यातील शेकडो जणांना पोलिसांनी मारहाणही केली आहे. 23 जानेवारीपासून आतापर्यंत 4 हजार जणांना अटक केली गेली होती. ही संख्या आता 5 हजाराच्या पुढे गेली आहे.
नवालनी यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी रशियामध्ये धुमसत असलेला असंतोष आता प्रकट होऊ लागला आहे. ठिकठिकाणी अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या विरोधात मोर्चे काढले जाऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात देशभरात अनेक मोर्चे काढले गेले.
सरकारविरोधात मोर्चे आणि आंदोलने करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा सरकारने यापूर्वीच दिला आहे. मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून 11 ठिकाणी आंदोलनाचे वृत्त आहे. या सर्व ठिकाणी मोर्च्याला आंदोलनाचे स्वरुप प्राप्त होऊ नये, म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अटकेत असलेल्या नवालनी यांना उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. या सुनावणीच्यावेळी नवालनी यांना काही वर्षांची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त पसरताच त्यांच्या समर्थकांनी उद्याही देशभर जोरदार आंदोलन करण्याचे नियोजन केले आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने ठिकठिकाणची रेल्वे स्थानके बंद ठेवण्यात आली आहेत. “फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’च्या मुख्यालयाबाहेर आंदोलकांनी निदर्शने करायची तयारी केली होती. पण तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेल्यामुळे आंदोलकांनी आपल्या निदर्शनांचे ठिकान त्वरित बदलले.
नवालनी यांच्या समर्थकांविरोधात बळाचा वापर केला जाण्यावर अमेरिकेने जोरदार टीका केली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात रशियाकडून केली जाणारी ही दडपशाही निंदनीय आहे, अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केली आहे. मात्र रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा रशियाच्या अंतर्गत राजकारणात अमेरिकेचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे.