मॉस्को – एका क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान एक उपग्रह नष्ट केला गेला असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे. रशियाने चाचणी दरम्यान एक उपग्रह नष्ट केला असल्याचा आरोप यापूर्वी अमेरिकेने केला होता. त्या वृत्ताला आज रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला.
“त्सेलिना-डी’ हा रशियाचाच उपग्रह 1982 पासून अंतराळात होता. रशियाने अलिकडेच घेतलेल्या एका क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान हा उपग्रह नष्ट झाला. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. रशियाने अशाप्रकारे आत्मघातकी आणि बेजबाबदार क्षेपणास्त्र चाचणी करून आपल्याच उपग्रहाचे नुकसान केले आहे. एवढेच नव्हे तर अंतराळ स्थानकाला धोका निर्माण होईल अशाप्रकारे अवकाश कचरा निर्माण होणारी चाचणी घेतली, अशी टीका सोमवारी अमेरिकेच्यावतीने करण्यात आली होती.
या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेल्या चार अंतराळ संशोधकांना असुरक्षितता निर्माण झाली होती. प्रचंड आवाजामुळे ते खडबडून जागे झाले आणि त्यांना परतीच्या अंतराळ यानामध्ये तातडीने आश्रय घ्यावा लागला होता, असे अमेरिकेची अंतराळ संस्था “नासा’ने म्हटले होते. या स्थानकात अमेरिकेचे 4, जर्मनीचा एक, रशियाचे दोघे अंतराळ संशोधक आहेत.