ग्रामीण महाआवास अभियानाला 5 जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

अभियान कालावधीत 7 लाख 50 हजार घरकुलांची बांधकामे

मुंबई  : राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण) ला 5 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

राज्यातील पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा तसेच घरकुलासोबतच शासनाच्या इतर योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावावे यासाठी हा निर्णय घेण्यात येत असून उर्वरित घरकुलांचे काम गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे; अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आवास दिन 20 नोव्हेंबर 2020 पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरु झालेल्या व 1 मे 2021 पर्यंत राबविण्यात आलेल्या या अभियानाची वाटचाल यशस्वीरित्या सुरू असून या कालावधीत सुमारे 7 लाख 50 हजार घरकुलांची बांधकामे हाती घेण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत 3 लाख 50 हजार घरकुले पूर्ण झाली असून 3 लाख 99 हजार घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. अभियानास आता ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, घरकुल बांधणीबरोबरच लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी इतर शासकीय योजनांशी सांगड घालण्यात येत आहे. अभियान कालावधीमध्ये पूर्ण झालेली घरकुले तसेच आधीच्या काळात पूर्ण झालेली परंतु इतर योजनांचा लाभ न मिळालेल्या घरकुलांना आता त्याचा लाभ देण्यात आला आहे. याद्वारे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत 7 लाख 10 हजार 782 लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत 4 लाख 73 हजार 605 लाभार्थ्यांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा लाभ देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 लाख 74 हजार 924 लाभार्थ्यांना गॅस जोडणीचा लाभ देण्यात आला, सौभाग्य योजनेअंतर्गत 3 लाख 48 हजार 77 लाभार्थ्यांना वीजजोडणीचा लाभ देण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधूनही घरकुल बांधकामासाठी मजुरीच्या स्वरुपात मदत करण्यात येते. याअंतर्गत 4 कोटी 34 लाख 77 हजार 929 इतके दिवस मनुष्यबळ निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत 4 लाख 25हजार 255 लाभार्थ्यांना उपजीविका साधनांचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

6 हजार गवंड्यांना घरकुल बांधकामाचे प्रशिक्षण….

घरकुलांची कामे वेळेत पूर्ण व्हावी व बांधकामासाठी गवंड्यांची कमतरता भासू नये यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 6 हजार 165 गवंडी प्रशिक्षित करण्यात आले असून 15 हजार 855 गवंडी प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.