Bengal Election : जिवाच्या भीतीपोटी अधिकाऱ्याने फेरमोजणीचा आदेश दिला नाही; ममतांचा दावा

कोलकता – पश्‍चिम बंगालच्या पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास सज्ज झालेल्या ममता बॅनर्जी यांना स्वत: नंदीग्राम मतदारसंघात पराभूत व्हावे लागले. त्या निकालाबाबत ममतांनी सनसनाटी दावा केला आहे. जिवाच्या भीतीपोटी निवडणूक अधिकाऱ्याने मतांच्या फेरमोजणीचा आदेश दिला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

बंगाल निवडणुकीची मतमोजणी रविवारी झाली. त्यावेळी नंदीग्रामच्या निकालाबाबत बराच काळ सस्पेन्स निर्माण झाला. अखेर ममतांचा पराभव झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार, भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी 1 हजार 956 मतांनी विजयी झाले. मात्र, त्याआधी ममता 1 हजार 200 मतांनी विजयी झाल्याची बातमी एका वृत्तसंस्थेने दिली होती. त्यामुळे ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने नंदीग्राममध्ये फेरमोजणीची मागणी केली. मात्र, ती मान्य करण्यात आली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर ममतांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना नंदीग्राममधील निवडणूक अधिकाऱ्याचा मोबाईल एसएमएस दाखवला.

फेरमोजणीचा आदेश दिल्यास मला गंभीर परिणाम भोगावे लागतील. कदाचित आत्महत्याही करावी लागेल, अशी भीती त्या अधिकाऱ्याने व्यक्‍त केल्याचा दावा ममतांनी केला. निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेला नंदीग्रामचा निकाल का फिरवला? त्यावरून आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे त्या म्हणाल्या. आमच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारा औपचारिक फोन कॉलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आला नाही, असा दावाही ममतांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.