मनोरंजनाच्या विश्वात काल्पनिक कथानकांचा वरचष्मा नेहमीच राहिला आहे. यामागचे मानसशास्र म्हणजे मानवी मनाला कल्पनेच्या विश्वात रमायला आवडते. त्यामुळेच प्रेमकहाण्या, सायन्स फिक्शन्स, पौराणिक विषयांवर आधारित कथानके यांची नेहमीच चलती राहिली आहे; पण या भाऊगर्दीत सत्यघटनांवर आधारित कथानकांवर बेतलेल्या कलाकृती जेव्हा येतात तेव्हा त्यांचे वेगळेपण आणि समाजमनाशी असणारे त्यांचे जोडलेपण यामुळे त्या चटकन लोकप्रिय होताना दिसतात. सध्या चलतीत असलेल्या ओटीटी विश्वालाही कदाचित यामुळेच सत्यकथांची भुरळ पडल्याचे दिसत आहे.
रुपेरी पडद्याचा तगडा प्रतिस्पर्धी ठरलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या आवडीचे अनेक शोज सादर केले जात आहेत. करोना काळात जन्मलेले ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता पाहता तरुणपिढीच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. यात कोणतेही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रातील मालिका पाहावयास मिळतात. यापैकी काही शो सत्यघटनेवर आधारित असून ते प्रेक्षकांनाही आवडताना दिसताहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणावर आधारित दिल्ली क्राइम मालिका तर कमालीची गाजली. अन्यही काही वेब सीरिजना अशाच प्रकारचे तगडा प्रतिसाद मिळाला आहे.
स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी
बिगबुल हर्षद मेहताचे नाव सर्वांच्याच परिचयाचे आहे. देशाच्या अर्थकारणावर परिणाम करणाऱ्या हर्षद मेहताच्या जीवनावर आधारलेली “स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज त्याचा कारनाम्याची उकल करते. शेअर बाजाराच्या निर्देशांकांची आणि समभागांची अत्युच्च भरारी आणि नंतर त्यात झालेली पडझड यामागील रहस्यांचे यथार्थ चित्रण या मालिकेत पाहता येईल. हर्षद मेहताची भूमिका प्रतीक गांधी यांनी साकारली असून त्यासाठी त्यांना 18 किलो वजन वाढवावे लागले. ही मालिका सोनी लिव्हवर पाहू शकता.
दिल्ली क्राइम सिजन-1
ही मालिका 2012 च्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. यात शेफाली शहा, रसिका दुग्गल आणि आदिल हुसेन यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेला 48 व्या ऍमी ऍवार्डसमध्ये बेस्ट ड्रामा सीरिज म्हणून गौरविण्यात आले आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर पाहावयास मिळेल. मालिकेत निर्भया प्रकरण कसे घडले आणि त्याचा छडा लावण्यासाठी दिल्ली पोलिसांनी घेतलेली मेहनत पाहावयास मिळते.
जामताडा : सब का नंबर आएगा
ही एक गुन्हेगारीवर आधारित वेबसीरिज आहे. झारखंडच्या जामताडा येथे घडलेल्या फसवणूक प्रकरणातील घटनांवर आधारित आहे. यात अमित सियाल, दिव्येंदू भट्टाचार्य, स्पर्श श्रीवास्तव यांची भूमिका आहे. हा शो नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
स्पेशल ओपीएस
ही मालिका अनेक दहशतवादी हल्ल्यांवर आधारित आहे. यात के. के. मेनन यांची प्रमुख भूमिका आहे. नीरज पांडे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचे काम या मालिकेने केले. मालिकेतील कलाकारांचा अभिनय हा प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करणारा ठरला. ही मालिका डिस्नी प्लस हॉटस्टावर पाहता येईल.
रंगबाज
या क्राइम शोमधील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ही मालिका आवर्जून पाहिली पाहिजे. मालिकेचा सीजन-1 हा गुंड श्रीप्रकाश शुक्लाची कहानी सांगतो. तर दुसरा सिजन मोस्ट वॉंटेड आनंदपाल सिंहच्या भोवती फिरतो. ही मालिका जी-5 वर उपलब्ध आहे.
मुंबई डायरिज : 26/11
26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अनेक मालिका आणि चित्रपट येऊन गेले; परंतु निखिल अडवानी यांनी पहिल्यांदा डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही मालिका साकारली. ही मालिका प्रामुख्याने 26/11 च्या हल्ल्यावर अवलंबून आहे, परंतु त्यात काही काल्पनिक कथानकही जोडले आहे. ही मालिका ऍमेझॉन प्राइमवर पाहू शकाल.
भौकाल सिजन-1
ही मालिका आयपीएस अधिकारी नवनीत सेकेसच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांनी मुझफ्फरपूरच्या बड्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या मालिकेत मोहित रैना हा आघाडीच्या भूमिकेत आहे. ही मालिका एमएक्स प्लेअरवर पाहू शकता.
खाकी: द बिहार चॅप्टर
ही वेब मालिका आयपीएस अधिकारी अमित लोढा यांचे पुस्तक “बिहार डायरीज’वर आधारित आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या काळात पोलीस अधिकारी आणि कुख्यात गुंडांत होणारी धूमश्चक्री यात पाहता येते. लालूप्रसाद यादव यांचा उतरता काळ आणि नितीशकुमारांकडे येणारे सत्तापद यादरम्यानची स्थिती प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
भूतकाळात डोकावल्यास वेबसीरिजच्या विश्वात सत्यघटनांवर आधारित अनेक मालिकांची निर्मिती झाल्याचे आणि त्यांना तुफान प्रतिसादही मिळाल्याचे दिसते.
काफिर
काफिर ही वेबसीरिज शहनाज परवीन या पाकव्याप्त काश्मीरमधील एका महिलेच्या प्रवासाची कहाणी सांगणारी आहे. तिला अतिरेकी घोषित केल्यानंतर आठ वर्षे भारतात तुरुंगवास भोगावा लागतो. तुरुंगात मुलीला जन्म देण्यापासून ते न्याय मिळवण्यापर्यंतचा या व्यक्तिरेखेचा प्रवास या मालिकेने समोर आणला. दिया मिर्झा आणि मोहित रैना या दोघांनी या वेबसीरिजद्वारे डिजिटल विश्वात पदार्पण केले होते. आकर्षक कथानकाव्यतिरिक्त या मालिकेमध्ये जबरदस्त सिनेमॅटोग्राफी देखील आहे.
द व्हर्डिक्ट ः स्टेट व्हर्सेस नानावटी
“द व्हर्डिक्ट ः स्टेट व्हर्सेस नानावटी’ ही वेबसीरिज 1959 च्या नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यातील खटल्याभोवती फिरणारी आहे. मकरंद देशपांडे, सुमीत व्यास, मानव कौल आणि सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या शोने सर्वांना थक्क केले.
अवरोध
2016 मध्ये उरीमध्ये झालेला भीषण दहशतवादी हल्ला आणि भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित “अवरोध’ ही वेबसीरिजही तुफान गाजली. अमित साध, नीरज काबी, दर्शन कुमार आणि मधुरिमा तुल्ली यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका होत्या. ही वेबसीरिज शिव आरूर आणि राहुल सिंग यांच्या इंडियाज मोस्ट फिअरलेसच्या एका प्रकरणावर आधारित आहे.
नाटक असो, चित्रपट असो अथवा वेबसीरिज सत्यघटनांवर आधारित कलाकृतींची निर्मिती केल्यास त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते, असे साधारणपणाने दिसून आले आहे. अर्थातच यामध्ये विषयाची अचूक हाताळणी, निःपक्षपातीपणा, सादरीकरणातील दमदारपणा, आशयघन कथानक आणि सशक्त अभिनय या सर्वांची जंत्री जमणे आवश्यक असते. हे मेतकूट जमून आल्यास काल्पनिक कथा, प्रेमकथा, विरह कहाण्या यांपेक्षाही सत्यकथांना मिळणारी पसंती लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित करणारी ठरू शकते. भारतातील रंगभूमी, सिनेमाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. वेबसीरिजही त्याला अपवाद नाहीत.
– सोनम परब