कृष्णवर्णीय तरुण जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येने जगभरात अमेरिकीची नाचक्की झालेली असताना काही दिवसांपूर्वी अमेरिकेतच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी एका कृष्णवर्णीय महिलेस विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. अमेरिकेच्या इतिहासात आणखी एक मानाचे पान जोडले गेले आहे.
कृष्णवर्णीय महिला केतांजी जॅक्सन यांचे नाव अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायधीश म्हणून निश्चित झाले. 51 वर्षांच्या जॅक्सन या फेडरल बेंचमध्ये नऊ वर्षे अपिलीय न्यायालयात न्यायधीश म्हणून राहिल्या आहेत. अमेरिकी सिनेटने 47 विरुद्ध 53 असा मतांचा कौल दिला आणि जॅक्सन यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदापर्यंत पोचण्याचा मार्ग मोकळा झाला. अर्थात सर्व सदस्यांनी आपल्या पक्षाला अनुसरून भूमिका घेतली; परंतु रिपब्लिकनचे तीन मते जॅक्सन यांच्या बाजूने पडले.
गेल्या अनेक दशकांपासून कृष्णवर्षीय आपल्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत. जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय युवकावर एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेले अत्याचार लोकशाहीला आणि अमेरिकेला काळीमा फासणारे होते; परंतु न्यायधीशपदाच्या निवडीवरून अमेरिकेला काही प्रमाणात कलंक पुसण्याची ऐतिहासिक संधी निर्माण झाली. मतदानाच्या वेळी उपाध्यक्ष कमला हॅरिस पीठासीन अधिकारी होत्या. या पदावर पोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत. नियुक्तीवरून गेल्या महिन्यात सिनेटमध्ये चार दिवस सुनावणी झाली. यावेळी न्यायधीश जॅक्सन यांनी आपल्या आईवडिलांनी वर्णभेदाविरुद्ध उभारलेल्या लढ्याचे स्मरण केले.
आता नागरी हक्काचे संरक्षण करणारे कायदे अस्तित्वात आल्याने एका कृष्णवर्णीय अमेरिकी महिलेला न्यायधीशपदापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. हार्वर्ड स्कूलमधून शिक्षण घेणाऱ्या जॅक्सन यांनी सरकारी वकील म्हणून काम केले आहे. त्यांनी एका खासगी कायदेशीर कंपनीतही सेवा केली आहे. अमेरिकी दंड आयोगाच्या सदस्य देखील राहिल्या आहेत. त्यांच्या यशाबद्दल उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी अभिनंदन करताना म्हटले की, न्यायाधीश केतांजी ब्राऊन जॅक्सन यांनी आज इतिहास घडवला आहे. त्या आपल्या देशातील असंख्य लोकांच्या नायिका आहेत.
सीनेटमध्ये बहुमत असलेल्या पक्षाचे नेते चक शुमेर यांनी म्हटले की, जॅक्सन यांचा विजय हा सीनेटसाठी, सर्वोच्च न्यायालयासाठी आणि संपूर्ण अमेरिकेसाठी ऐतिहासिक क्षण ठरू शकतो. हा एक आनंदाचा क्षण आहे. हा एक प्रेरणादायी दिवस आहे. 14 सप्टेंबर 1970 रोजी जन्मलेल्या जॅक्सन या डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किटमध्ये अपिलीय न्यायालयात फेडरल न्यायाधीश होत्या. एलेरी ब्राऊन आणि जानी ब्राऊन यांचे अपत्य असलेल्या जॅक्सन यांनी मियामी पालमेटा सिनियर हायस्कूल, हार्वर्ड विद्यापीठ, हार्वर्ड स्कूलमधून शिक्षण घेतले आणि त्यांना अमेरिकेतील एक कुशाग्र कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा त्यांचा प्रवास हा केवळ अमेरिकेलाच नाही तर जगभरातील नागरिकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. जॅक्सन यांचे पालक सरकारी शाळेत शिक्षक होते. 2017 मध्ये त्यांनी आपले पालक कृष्णवर्णीय असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे एका व्याख्यानात म्हटले होते. जॅक्सन यांचे पती डॉक्टर असून त्यांना दोन मुली आहेत. प्रत्येकाचा सन्मान करणे हा आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. आपण जे काही करतो, त्यात सर्वापेक्षा अधिक योगदान देण्याचा प्रयत्न करायला हवा.
– विधिषा देशपांडे