ऑकलंड – भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षाही सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज आहे, असे मत न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू वेगवान गोलंदाज व समालोचक सायमन डुल याने व्यक्त केले आहे.
रोहितने एक आक्रमक फलंदाज व सलामीवीर म्हणून संघात आपले स्थान भक्कम केले आहे. आता तर तो कसोटी संघातही आहे. गेल्या मोसमापासून रोहितच्या कामगिरीचा आलेख पाहिला तर असे लक्षात येते की एक सलामीवीर म्हणून तो सचिनपेक्षाही सरस वाटतो. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांत मला सचिनेक्षाही रोहितच जास्त सरस वाटतो. त्याला पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर वर्चस्व राखायला आवडते.
संघाला सर्वोत्तम सलामी देण्यासाठी तो प्रसंगी धोका पत्करुनही आक्रमक खेळ करतो. सहकारी फलंदाज समोर खेळत असतानाही ते देखील रोहितलाच फलंदाजीची जास्तीत जास्त संधी देतात. अर्धशतकी किंवा शतकी पल्ला गाठताना सचिन अनेकदा स्लोडाऊन झालेला दिसला आहे. मात्र, शतकासाठी 20 धावा असो किंवा 1 धाव रोहित आपली आक्रमकता सोडत नाही. सध्याच्या अधुनिक क्रिकेटमध्ये तर रोहितसारखेच फलंदाज संघात पाहिजेत तरच प्रतिस्पर्धी संघावर सातत्याने दडपण राखता येते, असेही डुल याने सांगितले.
रोहित हा केवळ टी-20 व एकदिवसीय क्रिकेटचा फलंदाज आहे अशी टीका त्याच्यावर सातत्याने केली जात होती. मात्र, गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहितला कसोटी संघात स्थान दिले गेले होते. या संधीचे त्याने सोने केले. गेल्या वर्षापासून मला रोहित शर्मा एक वेगळाच फलंदाज वाटतो. त्याच्यावर जबाबदारी आल्यासारखे वाटते. तो प्रगल्भ झाला आहे. आपली कारकीर्द, कामगिरी यांबाबत आता तो गंभीर बनला आहे व त्यामुळेच प्रत्येक सामन्यात आपली खेळी सरस व्हावी यासाठीच तो आग्रही असतो, असेही डुल यांनी व्यक्त केले.
आयपीएल गाजवेल….
करोनामुळे आयपीएल स्पर्धा सध्या स्थगित केलेली असली तरी जेव्हा ही स्पर्धा होइल त्यावेळी प्रचंड भरात असलेला रोहित ही संपूर्ण स्पर्धा गाजवेल. या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर कित्येकदा रोहितने संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केलेला पहायला मिळेल. फॉरमॅट कोणताही असो रोहित त्यात गेल्या दीड वर्षापासून सातत्याने यश मिळवत आहे, असे मत डुल यांनी व्यक्त केले.