शेतीच्या वादातून मायलेकरांवर रॉडने हल्ला

महाळुंगे इंगळे – तुमच्या शेतातून तुमच्या हद्दीप्रमाणे बरोबर रस्ता करून घ्या, असे सांगत असताना चिडलेल्या चार जणांनी संगनमताने बेकायदा गर्दी, जमाव जमवून मायलेकरांना शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी रॉड व दगडाने हल्ला केला. खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील कोये (ता. खेड) येथे बुधवारी (दि. 26) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या हाणामारीप्रकरणी येथील पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार जणांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

संतोष किसन राळे (वय 30, रा. राळेवस्ती, कोये, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष राळे व त्यांची आई सुमन राळे (दोघेही रा. राळे वस्ती, कोये) अशी हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. संतोष राळे यांच्या फिर्यादी वरून येथील पोलिसांनी सुरेश अर्जुन राळे, किरण सुरेश राळे, सचिन सुरेश राळे व सोन्या सुरेश राळे (सर्वजण रा. राळे वस्ती, कोये) या एकाच कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राळे वस्तीवर सुरेश राळे यांची गट नं. 225 मध्ये शेतजमीन आहे. या शेत जमिनीत बुधवारी (दि. 26) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोदकाम करून रस्ता काढण्याचे काम चालू होते.

त्यावेळी संतोष राळे यांची आई सुमन यांनी सुरेश राळे यांना सांगितले की, तुमच्या शेतातून तुमच्या हद्दीप्रमाणे बरोबर रस्ता करून घ्या. असे सांगत असताना त्यांनी त्यांचे काहीही ऐकून न घेता चिडलेल्या किरण राळे व सोन्या राळे यांनी सुमन यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून वाद मिटविण्यासाठी घटनास्थळी धावून आलेल्या संतोष राळे यांना सुरेश राळे यांनी लोखंडी रॉडने मानेवर जीवघेणा हल्ला चढविला. तर किरण राळे याने शेतातील दगड उचलून संतोषच्या डोक्‍यात घातला.

त्यानंतर सचिन राळे व सोन्या राळे यांनी हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी मायलेकरांना मारले. संतोष राळे यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी सुरेश, किरण, सचिन व सोन्या राळे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.