पुणे – वाहतूक नियमांना तरुणांचा ठेंगा

पुणे – शहरात अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुण वर्गाचे आहे. मात्र, हेच तरुण वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाहीत. बहुतांश अपघातात हेल्मेटचा वापर न केल्याने डोक्‍याला मार लागून मृत्यू होत आहे. यामुळे हेल्मेटचे महत्त्व समजत असले तरी ते घालण्याकडे तरुणाईचा कल मात्र दिसत नाही.

भरधाव वेगाने वाहन चालविणे, सिग्नलचा नियम न पाळणे, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे राहणे आदी नियमांचे पालन न करणाऱ्यांमध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. वाहनांची वेग मर्यादा वाढवत वाहन चालविण्याची “क्रेझ’ सध्या “तरुण’ वाहनचालकांमध्ये आहे. निरनिराळे आवाजाचे हॉर्न वाजवत वाहन “बुंगाट’ चालवण्यासह “कट’ मारत वाहनचालविण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांच्या बरोबरीने मुलींचा गाडी चालविण्याचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु हाच कल आणि “क्रेझ’ वाहनचालकांच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता अधिक असते, असे वाहतूक पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

या सगळ्याच्या बरोबरीनेच स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे असल्याचे तरुणाईचे मत असले तरी मात्र “शहरामध्ये हेल्मेट नको’ असाही सूर काही तरुणाईमधून उमटत आहे. शहरामध्ये अल्पवयीन मुलांचे गाडी वाढविताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण देखील जास्त आहे. दुचाकीस्वारांच्या होणाऱ्या अपघातांमध्ये हेल्मेटमुळे अपघात झाल्यानंतर मेंदूला इजा होण्याचे प्रमाण कमी होते, असे अभ्यासातून समोर आहे.

स्वत:च्या सुरक्षिततेला प्राध्यान्य दिले. तरी, शहरामध्ये वाहन चालवताना अनेकदा गर्दीचा सामना करावा लागतो आणि अपघातांची फारशी शक्‍यता नसते, असे मत तरुण व्यक्त करतात. मात्र “अपघात होण्याची शक्‍यता’ की “स्वत:चा जीव’ याबाबत तरुणांकडे प्राधान्यक्रम आहे की नाही, असा सवाल वाहतूक पोलिसांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

पावसाळ्यात करा हेल्मेटचा वापर
पावसाळ्यामध्ये सांडलेल्या ऑईलमुळे रस्ता निसरडा होता. यामुळे वाहने घसरण्याची शक्‍यता अधिक असते. त्याचबरोबर रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते आणि खड्ड्यांचा अंदाज दुचाकी चालकांना घेणे अवघड होते. परिणामी अपघात होण्याची शक्‍यता अधिक असते. शहरामध्ये सगळीकडे सिमेंटचे रस्ते असल्याने वाहने घसरण्याची शक्‍यता वाढत आहे. पर्यायाने अपघात होऊन दुचाकीस्वाराला मार लागण्याची तीव्रता वाढते.

पोलिसांच्या हिटलिस्टवर “आम्ही’च का? तरुणांचा सवाल
नो-पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे, सिग्नल मोडणे अशा बाबतीमध्ये पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईमध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही चौकात पोलीस कारवाई करताना फक्त तरुणांनाच का “टार्गेट’ करतात, असा सवाल तरुणांकडून उपस्थित केला जात आहे. साधारण 20 ते 25 वर्षांतील तरुण दिसल्यास बाजूला घेत दंडाची थेट वसूलीच होते, असे तरुणांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.