बगदाद – इराकच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अमेरिकेच्या तळाजवळ आज एक रॉकेट हल्ला झाला. एक रॅकेट या तळापासून अगदी जवळच पडले. हे रॉकेट पश्चिम अंबार प्रांतातील ऐन अल-असद हवाई तळाजवळ पडले. मात्र, त्याचा स्फोट झाला नाही.
अमेरिकेच्या लष्करी सूत्रांनी ही माहिती दिली.
या रॉकेटमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. तळाच्या परिघावरील कुंपणाचे काही अंशी नुकसान झाले आहे, असे इराकी सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.
हे रॉकेट जवळच्या अल-बगदादी भागातून डागण्यात आले असल्याचे सुरक्षा दलाच्या तपासणीत आढळून आले आहे. इराकमधील अमेरिकन सैन्यावर झालेला हा सर्वात अलिकडील हल्ला आहे. इराकमधील सैन्यावर आणि दूतावासावर पूर्वी ड्रोनचे हल्ले झाले आहेत आणि आता रॉकेटचे हल्लेही व्हायला लागले आहेत.
या हल्ल्यांमुळे इराकी तळावर काम करत असलेल्या अमेरिकेच्या कंत्राटी कामगारांना काम करणेही अवघड झाले आहे.
इराकमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सैन्याला माघारी बोलावण्याबाबत दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये ही चर्चा सुरू झाली आणि विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कारकिर्दीमध्ये ही चर्चा पुढे सुरू राहणार आहे.