घाटरस्ते ठरताहेत घातक!

दिवसेंदिवस वाढतेय पीएमपी बस अपघातांचे प्रमाण

पुणे – पीएमपी बस बंद पडण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. शहरासह परिसरात असलेल्या घाट रस्त्यांवर पीएमपी बस मोठ्या प्रमाणात बंद पडत असल्याने प्रवाशांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने प्रशासनाने लांब पल्ल्याच्या आणि घाट रस्त्यावरून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीसाठी सुस्थितीतील बस पाठवाव्यात, अशी मागणी होत आहे.

पीएमपी प्रशासन सासवड, नसरापूर, खेड-शिवापूर, आळंदी, पिंपरी, हडपसर, हिंजेवडी, बालेवाडी, शिवाजीनगर, कोथरूड, कात्रज यासारख्या अनेक ठिकाणी वाहतूक करते. या परिसरात काही भागात होणारी वाहतूक घाट रस्त्यांमार्गे होते. मात्र, याच रस्त्यांवर बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील काही दिवसांत घाट रस्त्यावर गाडीचा ब्रेक फेल होणे, इंजिन गरम झाल्याने आग लागणे अशा घटना घडत आहेत. या ठिकाणी अनेकदा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

बोपदेव घाट, कात्रज घाटात ब्रेकडाऊन वाढले
पीएमपी बसची कात्रज घाटमार्गे शिंदेवाडी, शिवापूर, नसरापूर आणि बनेश्‍वर येथे प्रवासी वाहतूक केली जाते. पण, कात्रज घाटात अनेकदा पीएमपीच्या बस बंद पडल्याचे पाहायला मिळते. तर, बोपदेव घाटमार्गे सासवड परिसरात प्रवासी वाहतुकीदरम्यान सतत बस अपघाताचे प्रकार घडतात. यामुळे शहर परिसरात सुस्थितीत बस पाठविण्याची आवश्‍यकता आहे.

शहरामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने शिवापूरवरुन नेहमीच ये-जा करतो. मात्र, बहुतांश वेळा कात्रज घाटात पीएमपी बस ब्रेकडाऊन झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. सतत घडणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. यामुळे, पीएमपीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
– साकेत शिवदास, विद्यार्थी

Leave A Reply

Your email address will not be published.