कोथरूड – “वेदभवन रोड मौत का कुवा, पीएमसी आणि एनएचएआय की दुवा’, “येतो म्हणता येत नाही, प्रश्न आमचा का सोडवत नाही’, “पीएमसी आणि एनएचएआयचा मेळ नाही, दोघांनी मांडला आमच्या जीवाशी खेळ,’ “इकडून गाडी तिकडून गाडी, अडकलो आम्ही मधल्या मधी,’ अशा घोषणांचे फलक घेऊन वेदभवन परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी (दि. 3) वेदभवन सर्व्हिस रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
एनडीए चौकातील नवीन उड्डाणपुल आणि रस्ता रुंदीकरण झाले. यामध्ये वारजेकडून एनडीए चौकाकडे जाताना वेदभवनजवळील रस्ता मोठा झाला. मात्र, नक्की हा रस्ता दुहेरी आहे की एकेरी. काही अधिकाऱ्यांकडून एक रस्ता एनएचएआयचा आणि दुसरा रस्ता पीएमसीचा, असे सांगण्यात आले. मात्र, आता हा रस्ता केवळ वारजेकडून वेदभवनकडे जाण्यासाठी खुला केला असून वेदभवनकडून वारजेकडे जाण्यास बंदी केली आहे. त्यामुळे येथील नागरिक संभ्रमावस्थेत आहे.
रस्ता मोठा झाला आणि अपघात वाढले, अशी वेदभवन परिसरात स्थिती निर्माण झाली आहे. या भागात जवळपास 30 ते 40 इमारती असून जवळपास चार ते पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. येथील नागरिक विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिक म्हणतात…
महामार्गावर सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे रस्त्यावर स्पीडब्रेकर, रम्बल आणि वेगमर्यादा असावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी सोनाली रामदासी यांनी केली आहे. तर, हजारो कोटी रूपये खर्च करून रस्ता तयार केला मात्र, आज येथील नागरिकांसाठी हा रस्ता असुरक्षित ठरत आहे.
दोन दिवसांपूर्वी मी स्वत: अपघातातून बचावलो, असे वेदभवनचे मोरेश्वर घैसास गुरूजी यांनी सांगितले. वेदभवन परिसरातील रस्त्यांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहोत. मात्र, दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाची वेळ आल्याचे मीना समगीर यांनी सांगितले.
नागरिकांनी मांडलेल्या समस्या
- सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडवर स्पीड ब्रेकर नाही
- पदपथ नसल्याने चालणेही अवघड
- वाहतूक नियम सूचना फलक नाहीत
- दुहेरी ऐवजी एकेरी वाहतूक धोक्याची
- टेकडी पूर्ण पाडून स्लिप रोड वारजे पर्यंत पूर्ण करावा
- टेकडी पासूनचा एक्झिट बंद करून वाहतूक ओऍसिस हॉटेलपासून वळवणे
- वरद कॉलनीकडे जाणारा तीव्र उताराचा रस्ता असुरक्षित