रायपूर- सध्या रायपूर येथील रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2021 या स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी (17 मार्च) पार पडला. या पहिल्या उपांत्य सामन्यात इंडिया लीजेंड्सने 12 धावांनी वेस्ट इंडिज लीजेंड्सवर विजय मिळवला. त्यामुळे इंडिया लीजेंड्स संघाने अंतिम फेरीत धडक दिली.
पहिल्या उपांत्य फेरीच्या नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिज लीजेंड्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंडिया लीजेंड्सने प्रथम फलंदाजी करताना विरेंद्र सेहवागने आपल्या नेहमीच्या आक्रमक अंदाजात ताबडतोब 35 धावा केल्या. तसेच इंडिया लीजेंड्स कडून सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरने केल्या. त्याने 42 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार लगावत दमदार 65 धावांची खेळी साकारली.
त्याचबरोबर युवराज सिंग आणि युसूफ पठाण यांनी अनुक्रमे 49 आणि 37 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे इंडिया लीजेंड्स संघाने 20 षटकांत 3 बाद 218 धावा केल्या. वेस्ट इंडिज लीजेंड्सकडून टी बेस्टने 2 आणि आर ऑस्टीन 1 विकेट्स घेतली.
दरम्यान 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज लीजेंड्स संघाचा सलामी फलंदाज ड्वेन स्मिथने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. त्याने 36 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. मात्र इंडिया लीजेंड्साठी ठरत असलेला हा अडथळा इरफान पठाणने दूर केला. तसेच नरसिंग देवनारायणने 59(44) धावांची खेळी केली. त्याचबरोबर ब्रायन लाराने 46(28)धावा केल्या. या तीन खेळाडूंना वगळता इतर कोणत्याही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
त्यामुळे या अटीतटीच्या सामन्यात वेस्ट इंडिज लीजेंड्सला 20 षटकांत 6 बाद 206 धावाच करता आल्या. त्यामुळे या संघाचे अंतिम सामन्यात पोहोचण्याचे स्वप्न भंगले. इंडिया लीजेंड्स संघाकडून विनय कुमारने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मनप्रीत गोनी, मुनाफ पटेल, प्रग्यान ओझा आणि इरफान यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
रविवारी खेळला जाणार अंतिम सामना :
या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका लीजेंड्स आणि श्रीलंका लीजेंड्स यांच्यात (19 मार्च) शुक्रवारी खेळला जाणार आहे. या सामन्यात विजयी होणार्या संघाला रविवारी (21 मार्च) अंतिम सामन्यात इंडिया लीजेंड्स विरुद्ध भिडावे लागणार आहे.