पुणे – नवले पुलाजवळ गेल्या काही वर्षात अनेक भीषण अपघात झाले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या रचनेतच दोष असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ही शक्यता गृहीत धरून प्रादेशिक परिवहन विभाग या रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यात रस्ता सदोष आढळल्यास रस्ते विकास महामंडळावर कारवाईची शक्यता आहे.
नवले पुलाजवळ मंगळवारी झालेल्या भीषण अपघातामुळे या रस्त्याच्या असुरक्षिततेचा मुद्दा प्रकाशझोतात आला. या भागातच गेल्या काही वर्षांत सातत्याने अपघात घडत आहेत. यामुळे हा भाग “अपघात प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित करून रस्त्याची तांत्रिक पाहणी (ऑडिट) होण्याची शक्यता आहे.
मुळात हा मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गाचा (क्र. 4) भाग आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर येणारी अवजड वाहने याच मार्गाने मार्गस्थ होतात. या वाहनांत भरलेल्या मालाचे वजन अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक असते. त्यात असणाऱ्या उतारावर ब्रेक लावल्यास तो निकामी होण्याची अथवा घर्षणामुळे टायर फुटण्याची शक्यता अधिक असते.
या मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. त्यानंतर त्यातील दोष निवारणासाठी संबंधितांना आदेश देण्यात येतील.