मुंबई – महाराष्ट्राचा स्टार खेळाडू व चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतूराज गायकवाडची बॅट अखेर तळपली. रविवारी झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल स्पर्धेतील लढतीत त्याच्या दमदार खेळीसह अम्बाती रायडू, कर्णधार रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर चेन्नईने 5 बाद 169 अशी भक्कम धावसंख्या उभारली.
नियमित कर्णधार हार्दीक पंड्याच्या अनुपस्थितीत रशीद खानने गुजरातचे नेतृत्व केले. त्याने नाणेफेक जिंकत चेन्नईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. गुजरातचे वेगवान गोलंदाज महंमद शमी व अल्झारी जोसेफ यांनी रॉबिन उथप्पा व मोईन अली यांना लवकर बाद केले व चेन्नईची स्थिती 2 बाद 32 अशीा बिकट केली होती. त्यानंतर ऋतूराजने वादळी फलंदाजी करत रायडूसह संघाचा डाव सावरला व संघाचे शतक फलकावर लावले.
रायडू स्थिरावलेला असताना 46 धावांवर परतला. त्याने या खेळीत 31 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार फटकावले. दरम्यान ऋतूराजने आपले या स्पर्धेतील पहिलेच अर्धशतक साकार केले. त्याने गुजरातच्या सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. तो शतकी खेळी करणार असे वाटत असतानाच 73 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 48 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली.
Taking turns to shine! Kudos to the Rutu-Rayudu show & now taking on to the field! 🦁💪#GTvCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/aMkzzisI18
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2022
कर्णधार जडेजाने दुबेच्या साथीत संघाचे दीडशतक फलकावर लावले. दुबेही धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 19 धावांवर अखरेच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद झाला. जडेजाने 12 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 22 धावांची खेळी केली. गुजरातकडून अल्झारी जोसेफने 2 गडी बाद केले. महंमद शमी व यश दयाळ यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 5 बाद 169 धावा. (ऋतूराज गायकवाड 73, अम्बाती रायडू 46, शिवम दुबे 19, रवींद्र जडेजा नाबाद 22, अल्झारी जोसेफ 2-34, महंमद शमी 1-20, यश दयाळ 1-40).