बीजिंग – चीनमधील कोळशाच्या खाणीत कार्बन मोनोऑक्साइडची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यामुळे 23 पैकी 18 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
ही दुर्घटना योंगचुआन जिल्ह्यातल्या चोंगकिंग नगरपालिकेतील दियाओशुइदोंग येथील कोळसा खाणीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. खाणीमध्ये कार्बन मोनोक्साईडचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याने या 18 कामगारांचा मृत्यू झाला. अडकलेल्या खाण कामगारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलासह बचाव कर्मचारी करीत आहेत.
दियाओशुइदोंग कोळसा खाण 1975 साली सुरू करण्यात आली आणि 1998 साली ही खाण खासगी मालकीची झाली. या खाणीतून दरवर्षी 1,20,000 टन कोळशाचे उत्खनन केले जाते. 2013 मध्ये याच खाणीतून हायड्रोजन सल्फाईड या विषारी वायूची गळती झाल्यामुळे तीन कामगारांचा मृत्यू झला होता आणि दोघे जण अत्यवस्थ झाले होते.