“सलमा कुरेशी’ने मिळवली संस्कृतमध्ये पीएचडी

गुजरात विद्यापीठातली लक्षणीय घटना

अहमदाबाद – माणसामाणसातील संवादाची भावना एकमेकांपर्यंत पोहोचवणारी कोणतीही भाषा कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माची नसते, याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. या गोष्टी पुस्तकांत वाचायला चांगल्या वाटतात. भाषेला धर्माच्या कोंदणात बंदिस्त करण्याचे अथवा अन्य काही सामाजिक निकष लावण्याचे प्रयत्न म्हणूनच हास्यास्पद ठरत जातात. असाच एक अनोखा विक्रम गुजरात विद्यापीठात प्रस्थापित झाला आहे; ज्यामुळे भल्याभल्या सनातनी धर्ममार्तंडांना एक चपराक मिळाली आहे.

गुजरात विद्यापीठातील एका मुस्लीम विद्यार्थिनीने संस्कृत भाषेतून पीएचडी पूर्ण करत हे त्रिवार सत्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सलमा कुरेशी असं या 26 वर्षांच्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सलमाने भारतामधील गुरु-शिष्य परंपरेचा अभ्यास केला आहे. सलमाने प्रा. अतुल उनागर यांच्या मार्गदर्शनाखाली “पूर्णेशू निरुपिता शिक्षा पद्धती एकम्‌ अध्ययन’ या विषयात प्रबंध सादर केला. या प्रबंधाबद्दल तिचा सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला आहे.

गुजरात विद्यापीठात वर्ष 1964 पासून संस्कृत भाषा शिकवली जाते. मात्र आजवर या भाषेत 200 विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये पीएचडी केली आहे, ज्यात सलमा पहिली अ-हिंदू मुलगी आहे. एवढेच नव्हे तर तिची चुलत बहिण फरीदा कुरेशी हीसुद्धा गांधीनगरमधून संस्कृतमध्येच पीएचडी करत आहे.

हे सुवर्णपदक मिळवल्यानंतर सलमाने सांगितले की, “भारतातील गुरु शिष्य परंपरेचा उल्लेख वेद आणि पुरणांपासून आढळतो. मला शाळेतच संस्कृत भाषा होती. संस्कृत भाषा शिकत असतानाच गीता, वेद आणि पुराण अभ्यासाची गोडी लागली. माझ्या परिवाराने देखील माझ्या संस्कृत अभ्यासाला कधीही विरोध केला नाही. त्यामुळे संस्कृत भाषेत पीएचडी पूर्ण करताना मला कोणतीही अडचण आली नाही. हिंदू धार्मिक ग्रंथ हे संस्कृतमध्ये असल्याने ती देवांची भाषा असल्याचे मानले जाते. मात्र, माझ्यामते कोणत्याही भाषेचा धर्माशी संबंध नाही. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची भाषा शिकण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे. प्राचीन काळी गुरु-शिष्य परंपरा होती. त्यामध्ये समाजातील सर्व वर्गाचा आदर करण्याचे शिक्षण दिले जात असे. ती सहिष्णू परंपरा कालांतराने लुप्त झाली, अशी खंत सलमाने व्यक्त केली.

सलमाने वर्ष 2017 मध्ये सौराष्ट्र विद्यापीठामधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने गुजरात विद्यापीठात पीएचडीसाठी नाव नोंदवले. तीन वर्षे तीन महिने अभ्यास केल्यानंतर सलमाने आपला प्रबंध पूर्ण केला आणि पीएचडी मिळवली. संस्कृत ही अनिवार्य भाषा म्हणून शिकवण्यात यावी आणि ही भाषा सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी इच्छाही सलमाने व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.