वजन वाढले की दमाही वाढतोच…

अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी काय करावे?

दमा हा एक दीर्घकालीन आजार असून, यात अनेकदा धाप लागते किंवा छातीत घरघरते. याचे गांभीर्य आणि वारंवारता व्यक्तीनुसार बदलते. हा आजार असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दर दिवशी किंवा आठवडय़ातून अनेकदा दिसू शकतात आणि काही व्यक्तींना शारीरिक श्रम केल्यावर वा रात्री ही लक्षणे दिसून येतात.

दम्याचे निदान झाले नाही आणि वेळेवर उपचार झाले नाहीत, तर त्या व्यक्तीवर आणि कुटुंबावर प्रचंड ताण येतो. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या दैनंदिन क्रियांवर मर्यादा येतात. त्यामुळे धाप लागणे, छाती आखडणे किंवा छातीमधील वेदना, खोकला किंवा घरघर, उच्छवास सोडताना छातीमध्ये घरघर होणे वा शिट्टीसारखा आवाज होणे आणि सर्दी किंवा फ्लुसारख्या श्वासांच्या विषाणूमुळे येणारा खोकला वा उबळ या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. या लक्षणांकडे वेळेवर लक्ष द्या आणि वेळेवर उपचार करा. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे दमा होण्याची शक्यता असते हे तुम्हाला माहीत आहे का? या संदर्भात झालेल्या अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे की, दमा आणि स्थूलपणा यांचा परस्परसंबंध आहे.

वाढते वजन ठरतेय घातक
दमा हा एक दीर्घकालीन आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०१६ साली १.९ अब्जांहून अधिक प्रौढ म्हणजेच १८ वर्षाहून अधिक वय असलेल्या व्यक्तींचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते. यापैकी ६५ कोटी व्यक्ती स्थूल होत्या. ५-१९ वयोगटातील ३.४० कोटी मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते किंवा ती मुले स्थूल गटात मोडत होती. ही निश्चितच चिंता वाढवणारी आकडेवारी आहे. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे रक्तदाब वाढतो आणि धाप लागते तसेच परिणामी दम्याची लागण होऊ शकते. दमा होण्यासाठी स्थूलपणा हे महत्त्वाचे कारण आहे, असे अनेक संशोधनाअंती दिसून आले आहे.

सडपातळ बांधा असलेल्या प्रौढांच्या तुलनेने स्थूल व्यक्तींमध्ये दरम्याचे प्रमाण अधिक असते आणि स्थूलपणामुळे मुले व प्रौढांना दमा होण्याची शक्यता अनुक्रमे २.० ते २.३ पटीने वाढते. लहानपणी होणा-या दम्यासाठी स्थूलपणा हे महत्त्वाचे कारण असते आणि त्यामुळे औषधांना प्रतिसाद कमी मिळतो आणि या वयोगटातील रुग्णांच्या जीवनमानावर परिणाम होतो. स्थूलपणा आणि दमा असेल, तर दम्याची तीव्रता वाढलेली असते, दमा नियंत्रणात आणणे कठीण जाते आणि दम्याचा आजार बळावण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे दम्याचे निदान करणे कठीण जाते. सामान्य वजन असलेल्या मुलांच्या तुलनेने प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या किंवा स्थूल मुलांना दमा होण्याची शक्यता अधिक असते.

या मागचे कारण असे आहे की, अतिरिक्त वजनामुळे छाती व पोटाच्या भागातील वाढलेल्या वजनामुळे फुप्फुसे आवळली जातात आणि श्वास घेणे कठीण जाते. चरबीयुक्त उतीमुळे सूज निर्माण करणारे घटक तयार होतात आणि त्यांचा फुप्फुसांवर परिणाम होतो आणि अनेक संशोधनांमधून दिसून आले आहे की, याची परिणती दम्यामध्ये होते. स्थूल व्यक्ती अधिक ओषधे घेतात, त्यांच्यातील लक्षणे अधिक तीव्र असतात आणि वजन प्रमाणात असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत आपल्या दम्यावर नियंत्रण मिळविण्यास कमी सक्षम असतात. दमा आणि ३० पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या व्यक्ती कमी बीएमआय असलेल्या व्यक्तींसारखा औषधांना प्रतिसाद देत नाहीत.

अतिरिक्त वजनामुळे दमा होण्याची शक्यता वाढते, असलेला आजार बळावतो आणि दम्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जाते. यासाठी आहारात ताजी फळे व भाज्यांचा समावेश करावा आणि चरबीयुक्त पदार्थाचे सेवन कमी करावे. तुम्ही कोणता आहार घ्यावा यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे चरबीयुक्त घटक अधिक असलेला आहार घेतल्यामुळे दमा असलेल्या व्यक्तींच्या श्वसनमार्गाला सूज येते. त्यामुळे हे टाळावे. चरबी कमी करण्यासाठी चालणे, धावणे, पोहणे यासारखे व्यायाम करावेत. त्याचप्रमाणे सेल्फ-मेडिकेट म्हणजे स्वत:हून औषधे घेऊ नये.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.