न्यूयॉर्क – करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सगळे जग ग्रासलेले आहे. कोट्यावधील लोकांच्या नोकरीवर-रोजगारावर गदा आलेली आहे. लाखो लोक भुकेने ग्रस्त आहेत. दुसरीकडे पृथ्वीच्या पाठीवरील अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये या काळातही घसघशीत वाढ झाल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यात सगळ्या जगात करोनाचा संसर्ग पसरल्यानंतर अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीत एक ट्रिलयन डॉलर म्हणजेच 10 खर्व डॉलरने (7,38,29,85,00,00,000 रुपये) वाढ झाली आहे. अमेरिकेत मोजक्या अब्जाधीशांच्या संपत्तीत सहा महिन्याच्या कालावधीतच एक ट्रिलियन डॉलरने वाढ झाली आहे.
अमेरिकी अब्जाधीशांच्या संपत्तीत एक तृतीयांशाने वाढ झाली आहे. 18 मार्च 2020 ते 24 नोव्हेंबर 2020 या कालावधीत 650 अब्जाधीशांच्या संपत्तीत 1.008 ट्रिलियन डॉलरने वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती एकत्रितपणे मोजली तर ती चार ट्रिलियन डॉलर (29,53,19,40,00,00,000 रुपये ) एवढी होते.
29 जणांची संपत्ती दुप्पट झाली. 650 अब्जाधीशांपैकी 29 जणांची संपत्ती या कालावधीत दुप्पट झाली आहे. त्याचरोबर या कालावधीत 36 नवे अब्जाधीश उदयाला आले आहेत. भारतातही या कालावधीत अनेक अब्जाधीश उद्योगपतींच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झालेली आहे. मात्र त्याचा नेमका आकडा समोर येऊ शकलेला नाही.
एलन मस्कच्या संपत्तीत सर्वात जास्त वाढ
इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिसी स्टडीजच्या अहवालानुसार अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांच्या संपत्तीत मार्च 2020 च्या मध्यापासून 70.7 अब्ज डॉलरने (52,19,77,03,95,000 रुपये) एवढी वाढ झालेली आहे. त्याचवेळी कंपनीच्या 20,000 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. इलेक्ट्रिक व्हेईकल आणि कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात काम करणारे टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांच्या संपत्तीत करोनाच्या साथीत 100 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. 18 मार्च 2020 रोजी त्यांच्या संपत्तीचे मूल्य 24.6 अब्ज डॉलर एवढे होते. त्यामध्ये वाढ होऊन 24 नोव्हेंबर 2020 पर्यंत त्यांच्या संपत्तीचे मूल्य 126 अब्ज डॉलरवर पोचले आहे.
झुकरबर्गच्या संपत्तीत 47 टक्के वाढ
फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गची संपत्ती 47.8 अब्ज डॉलरने म्हणजेच 47 टक्क्यांनी वाढली आहे. 18 मार्चला त्याच्या संपत्तीचे मूल्य 54.7 अब्ज डॉलर होते. त्यामध्ये वाढ होऊन 17 नोव्हेंबरपर्यंत ती 102.4 अब्ज डॉलरवर पोचली. याखेरीज गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेत ज्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झालेली आहे त्यामध्ये क्विकन लोन्स कंपनीचे चेअरमन डॅन गिल्बर्ट यांचाही समावेश आहे.