पिंपरी – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने पीएमपीला विविध प्रकारचे पास व संचलन तुटीपोटी दहा कोटी 23 लाख रुपये द्यावे लागणार आहे. नोव्हेंबर 2020 या महिन्याची ही तूट असून ही रक्कम आगाऊ स्वरुपात द्यावी, अशी मागणी पीएमपीकडून करण्यात आली आहे.
“पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडील 23 ऑक्टोबर 2020 रोजीच्या पत्रान्वये सन 2019-20 ची अंदाजित संचलन तूट 315 कोटी 10 लाख रूपये गृहित धरण्यात आली आहे. त्यापैकी 40 टक्क्यानुसार पिपरी – चिंचवड महापालिकेचा संचलन तुटीचा हिस्सा 126 कोटी 4 लाख रूपये आहे. तसेच विविध प्रकारच्या पासच्या अनुदानापोटी सन 2019-20 साठी 14 कोटी 80 लाख रूपयांची मागणी करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2020चे प्रतिमहा 10 कोटी 50 लाख रूपये संचलन तुट तसेच दरमहा सवलतीच्या पासपोटी 1 कोटी 23 लाख रूपये असे एकूण 11 कोटी 73 लाख रूपये आगाऊ स्वरूपात द्यावेत, अशी विनंती केली आहे.
महापालिकेच्या सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात पीएमपी निधी या लेखाशीर्षावर 244 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये संचलन तूट 133 कोटी 58 लाख रूपये, विविध प्रकारचे पास 14 कोटी 59 लाख, बस खरेदी 35 कोटी 83 लाख आणि ई बस सबसिडी 60 कोटी असा खर्च गृहीत धरण्यात आला आहे.
या रकमेतून संचलन तुटीपोटी प्रतिमाह नऊ कोटी रूपये आणि सवलतीच्या पासपोटी 1 कोटी 23 लाख रूपये असे एकूण 10 कोटी 23 लाख रूपये सन 2019-20 च्या अंदाजित संचलन तुटीचे लेखापरीक्षण होऊन तूट कायम होईपर्यंत नोव्हेंबर 2020 चे द्यावे लागणार आहेत.