- इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण; नियुक्तीच्या घोषणेकडे लक्ष
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी नुकत्याच मुलाखती पार पडल्या. तब्बल पंधरा जणांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. मुलाखतीदरम्यान प्रत्येकाने केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये “उत्साह’ वाढला आहे. पक्ष निरीक्षक कोणाचे नाव पुढे पाठविणार आणि प्रदेश समितीकडून कोणाच्या नावाच्या मोहोर उमटणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
सचिन साठे यांनी राजीनामा दिल्याने शहराध्यक्षपद पद रिक्त झाले आहे. प्रदेश सरचिटणीस आणि पिंपरी – चिंचवडचे पक्ष निरीक्षक राजेश शर्मा, नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम झाला. इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह मोठे शक्ती प्रदर्शन करत आपल्याच नेत्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी घोषणाबाजी करत उत्साह वाढविला होता. पंधरा इच्छुकांनी मुलाखती दिल्यानंतर या बाबतचा अहवाल प्रदेश समितीकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर मुंबईहून अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते कैलास कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश नवले, दिलीप पांढारकर, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, पिंपरी विधानसभा किसान कॉंग्रेस सभा अध्यक्षा सरिता जामनिक, असंघटित कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शहर युवकचे माजी अध्यक्ष सचिन कोंढरे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, अशोक काळभोर, रामचंद्र माने, आबासाहेब खराडे, सुदाम ढोरे, रवी खन्ना यांच्यासह पंधरा इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क करून इच्छा व्यक्त केली. त्यामुळे संधी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.