लोणी काळभोर- थेऊर ते कुंजीरवाडी दरम्यान रिक्षामध्ये 70 लीटर हातभट्टी तयार दारू विक्री करण्यासाठी घेउन जात असताना मिळून आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करून 14 हजार रूपये किमतीची हातभट्टीची तयार दारू व 25 हजार रुपये किमतीची एक रिक्षा असा एकूण 39 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी जयहिंद अर्जुन जयस्वाल (वय 22), हमीद मन्सुर मुल्ला (वय 40) व रमेश अशोक सुरवसे (वय 42, तिघे रा. रामटेकडी, आनंद नगर सर्व्हे नं. 108,109 आंबेडकर समाज मंदीरा जवळ, हडपसर पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी (दि. 20) सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे हे पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, गणेश करचे, परशुराम सांगळे हे थेऊर ते कुंजीरवाडी परीसरात 11 वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना कांबळे यांना गुप्त बातमीदारांमार्फत रिक्षा क्रमांक (एमएच 12 क्यूए 4787) मधून हातभट्टीची तयार दारू वाहतूक करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथकाने कुंजीरवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत नवीन मुठा उजवा कालवा येथे सापळा रचला. काही वेळाने 11 वाजण्याच्या सुमारास एक रिक्षा येत असताना दिसली. त्यावेळी रिक्षा थांबवून पाहणी केली असता. त्यामध्ये तीन इसम बसलेले होते. रिक्षाचे मागील सिटच्या मागील बाजूस दोन काळया रंगाचे व दोन हिरव्या रंगाचे प्रत्येकी 35 लीटरचे कॅन दिसून आले. त्यामध्ये एकूूण 70 लीटर तयार हातभट्टी दारू होती. तयार दारूसह रिक्षा जप्त करून त्या तीघांना अटक करण्यात आली आहे.