पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेल्या “त्या’ अधिकाऱ्यांनी खात्यावर रक्कम स्वीकारल्याबाबत खुलासे दिले असून, ते आयुक्तांकडे सादर झाले आहेत. आता या खुलाशांनंतर आयुक्त संबंधितांवर कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या 4 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी आपल्या खात्यावर पैसे स्वीकारल्याचे पुराव्यासह उघडकीस आणले होते. या प्रकाराबाबत समिती नियुक्त करून चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत दिले होते. याबाबत चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
प्राथमिक स्तरावर संबंधितांकडून खुलासे मागविण्यात आले होते. हे खुलासे नुकतेच आयुक्तांना प्राप्त झाले आहेत. याबाबत आयुक्तांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी तुषार कामठे यांनी शनिवारी आयुक्तांना भेटून केली होती. खुलासे आपणाला मिळालेले असून, दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे कामठे यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.
हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरुपाचे असून आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त करून ही चौकशी पूर्ण करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबत आपण आग्रही असून, आयुक्तांनी तात्काळ निर्णय न घेतल्यास आपण न्यायालयात जाणार असल्याचे कामठे म्हणाले.
उसने पैसे घेण्यास बंधने
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमानुसार शासकीय सेवेतील कोणत्याही व्यक्तीला उसने, कर्जाऊ अथवा मालमत्ता खरेदी विक्रीद्वारे करावयाच्या व्यवहारासाठी नियम ठरवून दिले आहेत. या नियमानुसार कर्मचारी, अधिकाऱ्यांना व्यवहारांसाठी प्राधिकृत अधिकारी, शासनाची परवानगी घेऊन व्यवहार करावे लागतात. तसेच ज्या व्यक्तीशी व्यवहार केल्याने दबाव येऊ शकतो असे व्यवहार करण्यास बंधने आहेत. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खात्यावर मोठी रक्कम घेत केलेल्या व्यवहारांसाठी ही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हा व्यवहार भ्रष्टाचार समजून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तुषार कामठे यांनी केली आहे.