अमरावती – करोनाविरोधी चमत्कारी औषध खाणाऱ्या निवृत्त मुख्यध्यापकाचे आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात करोनाने निधन झालं. कोटा मंडलमधील थिनेलापुडी गावांतील रहिवासी एन. कोटैया यांनी एका व्हायरल व्हिडीओमध्ये दावा केला होता की, चमत्कारी औषध खाल्ल्यामुळे १० मिनिटांच्या आत आपल्या ऑक्सिजनमध्ये वाढ झाली आहे.
नेल्लोरजवळ असलेल्या कृष्णापट्टनम गावात करोनाविरुध लढण्यासाठी लोकांना एक चमत्कारी औषध देण्यात येत होतं. हे औषध बी. आनंदैया ईशने तयार केलं होतं. हेच औषध निवृत्त मुख्यध्यापकाने घेतलं होतं. तसेच आपली ऑक्सिजन पातळी वाढल्याचा दावा व्हिडीओमध्ये केला होता.
नेल्लूरच्या सरकारी रुग्णालयातील अधीक्षक डॉक्टर सुधाकर रेड्डी यांनी म्हटलं की, एन. कोटैया यांना अनेक आजार होते. सोमवारी सकाळी त्यांचं निधन झालं. आंध्रप्रदेशमध्ये आयुर्वेद चिकित्सक बी. आनंदैया यांच्याद्वारे चमत्कारी औषधांचे वितरण करण्यात येत होते. ते काही काळ गावचे सरपंच देखील होते.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आनंदैया यांच्या टीमधील पाच पैकी तिघांची अँटीजन टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. तसेच गावातील २४ हून अधिक लोकांच्या चाचणीसाठी नमुने घेण्यात आले असून या लोकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत.
आनंदैय्या यांनी जडीबुटीद्वारे हे औषध तयार केले होते. हे औषध आयड्रॉपच्या स्वरुपात होतं. आंध्रचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी हे औषध कोविड उपचारासाठी वापरात आणण्याचे आदेशही दिले होते.