नवी दिल्ली – देशभरात करोनाने होणाऱ्या मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक कारागृहांमध्ये करोनाने शिरकाव केला असून अनेक गुन्हेगार शिक्षा भोगत असतानाच करोनाचा बळी ठरत आहेत. त्यातच अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र राजनवर उपचार सुरू असल्याचं समजतं.
तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या छोटा राजनचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं होतं. छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.
26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी छोटा राजनसह तिघाजणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती. त्यामुळं तो तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे.
Underworld don Chhota Rajan is still alive. He is admitted at AIIMS for treatment of #COVID19: AIIMS official
(File photo) pic.twitter.com/gvAgKDuPqC
— ANI (@ANI) May 7, 2021
छोटा राजन याच्या विरोधात सुमारे 71 खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी आतापर्यंत चार गुन्ह्यांचा निकाल लागला आहे आणि या चारही गुन्ह्यात छोटा राजन याला दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.