पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे तातडीने निकाली काढणे आवश्यक आहे. याबाबत कर्मचारी महासंघाने वारंवार वेळेत प्रकरणे निकाली काढण्याची मागणी केली होती. मात्र, लेखा विभागातील मर्यादित कर्मचाऱ्यांमुळे या मध्ये अडचण येत होती. त्यामुळे यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती पेन्शन कक्षामध्ये करण्यात येणार आहे. त्यास स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची ऑनलाइन बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. नितीन लांडगे होते. महापालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी वयोमानानुसार सेवानिवृत्त होतात. तर काही जण ऐच्छिक सेवानिवृत्ती स्वीकारतात. तसेच मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर आर्थिक लाभ देणे बंधनकारक आहे. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी लेखा विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने ही प्रकरणे निकाली काढण्यामध्ये वेळ लागत होता. त्यामुळे प्रशासनाकडे अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने महापालिकेच्या सेवेमधून सेवानिवृत्त झालेल्या व या कामाचा अनुभव असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त लेखापाल वसंत मधुकर शिंदे व सेवानिवृत्त उपलेखापाल बाजीराव केशवराव ओंबाळे यांची नियुक्ती केली आहे. आदेशाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी त्यांची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
कर्मचारी महासंघाकडून याबाबाबत वारंवार मागणी केली जात होती. जे कर्मचारी सेवानिवृत्त होतात, त्यांना त्यांचे आर्थिक लाभ वेळेत देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा करून मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय कार्यवाहीनंतर त्यांची नियुक्ती होईल.
– ऍड. नितीन लांडगे, अध्यक्ष, स्थायी समिती.