पुणे -शहरात मागील काही दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र शहराच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. मात्र, शनिवारपासून (12 जून) पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नैऋत्य मौसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. तर उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र कायम आहे. मागील 24 तासांत कोकण गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. 15 जूनपर्यंत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टीचा इशारा असून, किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
तर, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शहर आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.