पुणे – म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या ऍम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची कमतरता भासत होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी 5 हजार इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे.
जेनेटिक लाइफ सायन्सेस प्रा.लि. वर्धा या कंपनीने 50 हजार ऍम्फोटेरेसिन-बी इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले. पुणे विभागासाठी कंपनीने गुरुवारी पाच हजारऍम्फोटेरेसिन बी इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जेनेरिक लाइफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी पाच हजार ऍम्फोटेरेसिन बी इंजेक्शन सुपूर्त केले. येत्या आठवडयात पुणे विभागसाठी आणखी दोन हजार म्फोटेरेसिन बी इंजेक्शन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन दिलासा देणारे ठरेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.