पिंपरी, दि. 23 – चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यातच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही ही निवडणूक लढण्यासाठी तयारी चालविली असून तसा ठराव पक्षाचे शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 21) बैठकीत पारीत करण्यात आला. आता पक्षश्रेष्ठींचे आदेश आल्यास ही निवडणूक लढण्याची तयारी शिवसैनिकांनी सुरू केली आहे.चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक लढण्यासंदर्भात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक पार पडली. बैठकीत निवडणूक लढण्यासंदर्भात सर्वानुमते सकारात्मक चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून तसा ठराव सर्वानुमते सम्मत करण्यात आला. हा ठराव वरिष्ठांकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख, उपशहर प्रमुख, विधानसहभा प्रमुख, महिला पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाचे शहराध्यक्ष ऍड. सचिन भोसले यांनी सांगितले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्व. बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांना मानाणाऱ्या सर्वधर्मीय मतदारांचा टक्का मोठा आहे. येथील मतदारांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीत संपूर्ण विधानसभेतून शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करून यापूर्वीच्या निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला कल दिला. त्यामुळे विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी पाच ज्येष्ठ पदाधिकारी इच्छुक आहेत.
इतर पक्षातील इच्छुकांनीही साधला संपर्क
ऍड. भोसले यांनी सांगितले, पक्षातील इच्छुकांनी देखील पक्षाशी संपर्क साधला आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. आता वरिष्ठ पातळीवरून याबाबत निर्णय येताच कामाला लागण्याची तयारी शिवसैनिकांनी ठेवली आहे.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी पाच ज्येष्ठ पदाधिकारी इच्छुक आहेत. संपूर्ण मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशाखाली ही निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. इच्छुकांची मागणी संपर्क नेते आणि ज्येष्ठ नेत्यांपुढे मांडणार आहे.
ऍड. सचिन भोसले, शहरप्रमुख,
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
वंचितच्या पाठबळावर करिश्मा घडण्याची अपेक्षा
चिंचवड विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद आहे. पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांचाही पाठिंबा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीला मिळालेला आहे. त्यामुळे शहरात महाविकास आघाडीची ताकद निश्चितच वाढली असून पक्षप्रमुखांनी जर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार दिला तर निश्चितच त्याला बहुमताने आम्ही निवडून आणू, असा विश्वास शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले यांनी व्यक्त केला आहे.