देहूगाव, दि.15 -देहू नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा तथा स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती रसिका स्वप्नील काळोखे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर स्वीकृत सदस्य आनंदा सोपान काळोखे आणि रोहित काळोखे यांनी ही नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
स्वीकृत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे; तर उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांच्याकडे देण्यात आला असून, तो स्विकारण्यात आला आहे.
उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे यांची नऊ महिन्यापूर्वी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर एक महिन्यांनी (11 मार्च ) स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली होती.
देहू नगरपंचायतीचे मुख्य निवडणूक डिसेंबर व जानेवारी या दोन टप्प्यात पार पडली होती. त्यामध्ये 17 नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आल्यानंतर विरोधक उरले नव्हते. मात्र , उपनगराध्यक्ष पदाचा तर स्वीकृत नगरसेवक पदाचे राजीनाम्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू असून आता सभापती ही बदलणार का? असा सवाल देहूकर करत आहेत.