शांत डोक्‍याने साताऱ्यात पवारांचे “डॅमेज कंट्रोल’

सातारा – राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या राजकारणाचे कसबं अगदीच वादातीत आहे. महाराष्ट्रात भाजपची बहुचर्चित मेघा भरती फॉर्मात असताना राष्ट्रवादीची अवस्था फारच विचित्र झाली आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतर सातारा जावली मतदारसंघाची पडझड रोखण्यासाठी स्वतः पवार साहेबांनी सर्किट हाऊसवर तळ देत गाठीभेटींचे सत्र गतिमान केले. राष्ट्रवादीच्या चार आमदारांशी गुफ्तगू करत राजमाता कल्पना राजे भोसले यांच्याशीही पवारांनी संवाद साधला. पवारांच्या या गाठीभेटींमध्ये सुध्दा साताऱ्याची जुळवाजुळव सुरू होती हे प्रकर्षाने लक्षात आले.

स्व. लक्ष्मणराव तात्या बॅंकेत किती वर्ष संचालक होते असा थेट प्रश्‍न त्यांनी आमदार मकरंद पाटील यांना विचारला. राष्ट्रवादीच्या गळतीची खळबळ पत्रकारांच्या मनात असताना पवार साहेबांचे मात्र शांत डोक्‍याने काम सुरू होते. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी राखणार आणि त्यासाठी तीन अर्ज सुद्धा आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावेळी सर्वांच्या नजरा आपसुक आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर स्थिरावल्या. तेव्हा प्रसंगाचा रोख पवारांनी ओळखत वेळ आल्यावर नावे जाहीर करू असे सांगितले.

साताऱ्याचे आमदार पक्षांतर करून गेले तरी पुढच्या पर्यायासाठी राष्ट्रवादी तयार असल्याचा मेसेज जणू त्यांना द्यायचा होता. शिवेंद्रराजे यांचा भाजप प्रवेश आणि आमदार मकरंद पाटील यांची संचालक म्हणून जिल्हा बॅंकेत एन्ट्री हे राजकीय घटनाक्रम एकाच दिवशी घडले. शिवेंद्रराजेच्या खळबळजनक पवित्र्यानंतर सावध झालेल्या राष्ट्रवादीने मकरंद आबांच्या वर्णीची खेळी केली. मात्र या निवडीत शिवेंद्रराजेंसह अन्य संचालक रामराजे नाईक निंबाळकर यांना बाजूला ठेवण्यात आले.

या सर्व घडामोडीमागे पवारांचा अदृश्‍य हात असल्याचे जाणवले. जिल्हा बॅंकेविषयी पवारांना पत्रकारांनी छेडताच त्यांनी थेट संचालकाकडे या विषयाचा चेंडू टोलवला. मकरंद आबांची निवड आणि दोन ज्येष्ठ संचालकांची अनुपस्थिती यांच्याशी आपला सबंध नसल्याचे पवारांनी भासवले. मात्र माझा जो काटा काढण्याचा प्रयत्न करेल त्याचा काटयाने काटा काढला जाईल असा रोखठोक इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी साताऱ्यात दिला. त्यामुळे आगामी काळात जिल्हा बॅंकेतही टोकाचे पक्षीय राजकारण रंगणार हे उघड झाले.

कल्पनाराजेंची पवारांशी भेट
राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी शरद पवार यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन त्यांच्याशी तासभर सखोल चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत सुनिल काटकर उपस्थित होते. शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे सातारा मतदार संघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे स्टार कंपेनर खा. उदयनराजे भोसले यांच्याकडे मोठी जबाबदारी येण्याची दाट शक्‍यता आहे. अशाच चर्चांना दुजोरा देणारा कमराबंद खल झाल्याचा हवाला सुत्रांनी दिला आहे.

…आणि आव्हाड पळाले !
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. आव्हाडांच्या उपस्थितीत पत्रकारांनी पवारांना हा थेट प्रश्‍न केला असता त्याचे उत्तर देणे पवारांनी टाळले आणि पत्रकार परिषद आटोपली. तेव्हा आव्हाड घाईघाईने उठून बाहेर पडू लागले. त्यावेळी पुन्हा काही जणांनी त्यांना या प्रश्‍नावर छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र पवार बोलले हे अंतिम मी काही बोलणार नाही असे म्हणत ते निघून गेले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)