नगर, (प्रतिनिधी) – शहरातील झेंडीगेट परिसरात तीन मालवाहू वाहनातून कत्तलीसाठी जाणार्या १३ गोवंशीय जनावरे व ३ म्हैस वर्गीय जनावरांची सुटका कोतवाली पोलिसांनी केली आहे. या बाबत चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून तब्बल २० लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पदभार स्किकारल्यानंतर ही सर्वात मोठी कारवाई आहे.
अरबाज खलील शेख, (वय २३, रा. कोठला, नगर), फैजल अस्लम शेख, (वय 20, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, नगर), सलीम शब्बीर कुरेशी, फैजान अब्दुल कुरेशी, (रा. झेंडी गेट, नगर) यांचे विरुध्द पोलीस सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकाला अटक करण्यात आली आहे.
मंगळवार (दि.१३) रोजी दीड वाजेच्या सुमारास पो.नि. दराडे यांना शहरातील झेंडी गेट परिसरातील कारी मशिद जवळ बंद पड्लेल्या सार्वजनिक शौचालया जवळ एक बंद खोलीत गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ रात्रगस्त पथकाने छापा टाकून वरील जनावरांची सुटका केली. त्यांच्याकडून ३ मालवाहू वाहन तसेच १२ गोवंशीय जनावरे ताब्यात घेत असा २० लाख ५५ हजारांचा मुद्देमला हस्तगत केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकाचे प्रविण पाटील, दीपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, संकेत धीवर यांच्या पथकाने केली.