पुणे – मर्चंट नेव्हीतील तरुणाचे पनवेलमधून अपहरण करुन धनकवडीमधील लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. यानंतर त्याच्या वडिलांकडे अडीच लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. दरम्यान अपहरण झालेल्या तरुणाने वडिलांना व्हॉट्सऍपवर लोकेशन पाठवले होते. त्यानूसार पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक एकने त्याची सुटका केली.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अभिजीत राजेंद्र थोरात (वय 20, रा. कर्जत, नगर), निखिल रमेश कांबळे, (वय 31, रा. दत्तनगर कात्रज), प्रथमेश अनिल पाटील (वय 22, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) व एक विधीसंघर्षित बालक आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिंदखेड राजा (धुळे) येथील 25 वर्षीय तरुणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुण मार्च 2023 मध्ये मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जयपूर येथील खासगी प्रशिक्षण केंद्रात गेला होता. त्यावेळी हे चौघे आरोपी देखील आले होते. ते 45 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर आपल्या घरी परत गेले होते.
दरम्यान, जामनगर (गुजरात) येथील राहुल सिंग नावाच्या व्यक्तीने फिर्यादी तरुणाचे नोकरीचे काम करून दिले. त्यानंतर थोरातने तरुणासोबत संपर्क साधला. त्याने कसे जॉईनिंग केले अशी विचारणा केली. तेव्हा तरुणाने सिंग याचा संपर्क क्रमांक दिला. पुढे थोरात आणि त्याच्या साथीदारांनी परस्पर सिंग याच्यासोबत संपर्क करून अडीच ते तीन लाख रुपये दिले. मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. यामुळे फिर्यादी तरुणाने आपली फसवणूक केली असा, त्यांचा समज झाला. त्यांनी 29 जुलै रोजी फिर्यादीशी संपर्क साधला. तेव्हा तो धुळे येथे निघाला होता. निखिल कांबळे आणि त्याच्या साथीदाराने पनवेल कळंबोली येथे त्याला गाठून पुण्यात आणले व लॉजमध्ये कोंडून ठेवले होते.
…अन् लोकेशन शेअर केले
आरोपींनी तरुणाला लॉजमध्येच कोंडून ठेवले होते. काही कारणास्तव ते लॉजमधून बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेत तरुणाने मोबाइलवरून आपल्या वडिलांना ही माहिती देत लोकेशन शेअर केले. त्यामुळे पोलिसांना आरोपींना पोचता आले.