पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रिया ः सर्व माहिती ऑनलाइन
…तरीही तांत्रिक अडचणींची शक्यता
प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी उमेदवारांना आठवड्याभराचा कालावधी देण्यात येणार आहे. यात इतर काही माहितीचे विकल्प नोंदविण्याची संधी देण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सुविधा सुरू झाल्यानंतर त्यात काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याकरिता उमेदवारांना सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागातील 1 लाख 23 हजार उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठी पोर्टलवर नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांनी बिदूंनामावलीची तपासणी पूर्ण करून पोर्टलवर जाहिराती अपलोड केल्या आहेत.
यावरुन एकूण 12 हजार शिक्षकांच्या जागा भरतीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका यामुळे भरतीप्रक्रियेत अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून मंदावली आहे.उमेदवारांना पोर्टलवर माहिती अपडेट करण्यासाठी अनेकदा संधी देण्यात आली होती. या कालावधीत बहुसंख्य उमेदवारांनी संधीचा फायदा घेतला आहे. उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागाने सुरू ठेवले होते. यासाठी गेल्या 6 मेपासून पोर्टलवरील नोंदणीच्या सर्व सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या. संगणक प्रणाली तयार झाली असून ती लवकरच पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.
बालभारतीमध्ये शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच महत्वाची बैठक झाली. या बैठकीत संगणक प्रणाली, प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, तांत्रिक अडचणी दूर करणे यावर चर्चा करुन महत्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. यामुळे आता भरती प्रक्रिया पुढे सरकणार आहे. उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविता यावा, यासाठी मार्गदर्शनपर व्हिडीओही तयार करण्यात आला असून तो पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. प्राधान्यक्रम नोंदविण्याची संधी कधी उपलब्ध होणार याबाबत उमेदवारांकडून शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा केली जात आहे. फोनद्वारेही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर उमेदवारांना 13 मेपासून सुविधा सुरू होणार आहे.