इस्लामाबाद – आठवड्याभरापूर्वी तोडफोड झालेल्या हिंदू मंदिराचे पूर्ण नूतनीकरण करण्यात आले असून हे मंदिर आता पुन्हा हिंदू भाविकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उपायुक्त खुर्रम शहझाद यांनी सोमवारी ही माहिती दिली. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी उपायुक्तांसह रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग गावातील या मंदिराला भेट दिली तेव्हा ही माहिती देण्यात आली.
या मंदिराच्या सुरक्षिततेसाठी मंदिराभोवती कुंपणाची भिंतही बांधण्यात आली आहे. मंदिराच्या नूतनीकरणानंतरच मंदिरातील मूर्तीचीही फेरस्थापना केली जाणार आहे. या संपूर्ण नूतनीकरणासाठी आलेला सर्व खर्च या मंदिरावर हल्ला केलेल्या हल्लेखोरांकडून वसूल करण्यात येणार आहे, असेही जिल्हा उपायुक्तांनी सांगितले.
हे मंदिर आणि हल्ल्यामुळे दुसरीकडे रहायला गेलेल्या हिंदू नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक सर्वंकष योजना तयार करण्यात आली आहे. या नागरिकांना पोलिसांची अनुमती मिळाल्यानंतर माघारी आणण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
तोडफोड झालेल्या मंदिराची फेरउभारणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्याबद्दल स्थानिक हिंदूंच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे.