बीजिंग – चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाल्याबद्दल काही अधिकाऱ्यांना शिक्षा करण्यात आली आहे. स्थानिक सरकारमधील प्रमुख, आरोग्य आयोगाचे आयुक्त, हॉस्पिटल आणि विमानतळांचे प्रमुख अधिकारी अशा तब्बल 47 अधिकाऱ्यांना डेल्टा व्हेरिएंटच्या प्रादुर्भावाबद्दल दोषी मानण्यात आले असून त्यांना शिक्षा देण्यात आली आहे, असे वृत्त आज स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.
निनजियांग ल्युकोऊ आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाल्याबद्दल 15 अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. काही अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर काहींना निलंबित करण्यात आले आहे आणि काही जणांना कठोर इशारा देण्यात आला आहे.
चीनच्या पूर्वेकडील निनजियांग प्रांतातून पसरलेला डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव सध्या चीनमधील 31 प्रांतांपैकी निम्म्या प्रांतांमध्ये पसरलेला आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये देशभरात 1 हजार जणांमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गाची लक्षणे आढळली आहेत.
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाऊन, सामुहिक चाचण्या, व्यापक विलगीकरण आणि प्रवासांवर निर्बंधांसारखे उपाय सुरू करण्यात आले आहेत.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात 2019 च्या अखेरीस चीनमधूनच झाला होता. आता डेल्टा व्हेरिएंटची साथ देखील पसरायला लागली आहे. मे महिन्यात चीनने सर्व प्रांतांच्या सीमांवर कुंपण घातले होते. आता डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार वाढायला लागल्यामुळे सीमेंवरील हे कुंपणाचे निर्बंध अधिकच कोटेकोर केले गेले आहेत.