पुणे – महावितरणच्या पुणे परिमंडळात विविध कारणांमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित (पर्मनन्ट डिस्कनेक्ट) केलेल्या ग्राहकांच्या वीज जोडण्यांची तपासणी सुरू करीत करवाईचा “खटका’ टाकला आहे. या तपासणीत तब्बल 1735 ग्राहकांनी सुमारे 3 कोटी 13 लाख रुपयांची वीज चोरी केल्याचे समोर आले आहे. पुणे विभागात वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेले एकूण 80 हजार 999 ग्राहक असून त्यातील 61 हजार 397 ठिकाणी आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडीत झाला तरी थकबाकी असलेल्या 19 हजार ग्राहकांकडून 30 कोटी 59 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
वीज जोडण्यांची तपासणी
पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत एकूण 2 लाख 66 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, त्यांच्याकडे 417 कोटी 52 लाख रुपयांची थकबाकी आहे. या सर्व वीज जोडण्यांच्या प्रत्यक्ष तपासणीचे काम महावितरणकडून सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात गेल्या दोन वर्षांतील 80 हजार 999 ग्राहकांची यादी तयार करण्यात आली आहे. या मोहिमेत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्यासह वरिष्ठ अभियंता, अधिकारी विविध ठिकाणी जाऊन तपासणी करीत आहेत. काही भागामध्ये प्रसंगी पोलीस संरक्षण घेण्यात येत आहे. महावितरणकडून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला असताना वीजवापर सुरू असल्याचे प्रकार आढळून आले.
“तो’ संदेश दिशाभूल करणारा…
समाज माध्यमांवर बुधवारी वीजदराबाबतचा एक संदेश सर्वत्र मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या संदेशात महावितरणचे वीजदर हे सामान्य नागरिक, मश्जिद, चर्च आणि मंदिरासाठी वेगवेगळे असल्याचा दावा करण्यात आला आहे. समाज माध्यमांवरील हा संदेश दिशाभूल करण्यासोबतच सामाजिक सलोख्याचे वातावरण दुषित करणारा असल्याने, अशा फसव्या संदेशाला कुणीही बळी पडू नये असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.