“नामांतरामुळे मुस्लीम मतांना धोका नाही, काँग्रेसने चिंता करू नये”

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ येत असून सर्वच पक्ष तयारी लागले आहे. औरंगाबादचे नामांतर करण्याचा मुद्दा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आला आहे. भाजप यासाठी आक्रमक झाले असून सत्तेत असलेल्या शिवसेनेचे नेते देखील नामांतरासाठी आग्रही दिसत आहे. माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नामांतराला विरोध करू नका, असे आवाहन काँग्रेसला केले आहे.

औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम वाटत नाही, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे  यांनी केले. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झाल्यास आपली मुस्लीम मते जातील, हा गैरसमज काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावा. औरंगाबादचे नामांतर हा अस्मितेचा प्रश्न आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर ‘सामना’तील रोखठोक या सदरातून काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यात आला होता. याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रत्युत्तर दिले. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय ? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत, असा मजकूर या पत्रकात लिहला होता.

यावर चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेची बाजू मांडली. ते म्हणाले की,  बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम मतांना धक्का बसण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकत्र बसून या सगळ्यातून मार्ग काढतील. मात्र, औरंगाबादचे नामांतर होणार, हे निश्चित आहे. आगामी काळात काँग्रेस नामांतराला विरोध करणार नाही, असा विश्वास मला वाटत असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.