कॅमेरोन पॅरिश (अमेरिका) – लॉरा चक्रिवादळाने शनिवारी जबरदस्त तडाखा दिल्यानंतर ल्युसियाना प्रांतात आज जनजीवन पुन्हा स्थिरस्थावर होऊ लागले असून आता मदतकार्याला प्रारंभ झाला आहे.
चक्रिवादळानंतर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत आणि विजेचे खांबही कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. लॉरा चक्रिवादळामुळे संपूर्ण अमेरिकेमध्ये 16 जण मरण पावले आहेत. त्यापैकी निम्मे जण जनरेटरमधील कार्बन मोनोक्साईडच्या विषारी वायुमुळे मृत्युमुखी पडले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ल्युसियाना आणि टेक्सासमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी या भागाचा दौराही केला.
लॉरा चक्रिवादळ 15 वर्षांपूर्वी आलेल्या कतरिना वादळापेक्षही भयानक होते, असे ट्रम्प यांच्याबरोबर दौऱ्यावर असलेल्या ल्युसियानचे गव्हर्नर जॉन बेल एडवर्डस यांनी म्हटले आहे. मात्र तरिही लॉरा वादळामुळे झालेले नुकसान अपेक्षेपेक्षा कमी आहे.
वादळादरम्यान वेस्टलेक येथील चार्ल्समधील क्लोरिन प्लॅन्टला आग लागली. ही अग् विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पर्यावरण गुणवत्ता विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या प्लॅन्टमधील रसायनांच्या टाक्या फुटल्याने रसायने सर्वत्र सांडली आणि त्यांनी पेट घेतला होता. येथून 1 मैलावरील आश्रय शिबिरामध्ये अनेक नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय केली गेली आहे. रसायनांच्या विषारी वाफांचा त्रास होऊ नये, म्हणून दारे-खिडक्या लावून घेण्याची सूचना त्यांना केली गेली आहे.
लेक चार्ल्समध्ये 80 हजार नागरिकांना लॉरा चक्रिवादळाचा फटका बसला. अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून टेलिफोनच्या तारा तुटल्याने संपर्क यंत्रणाही ठप्प पडली आहे. लॉरा चक्रिवादळ अमेरिकन आखाती किनारपट्टीकडे जाताना वाटेतील हैती आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये सुमारे दोन डझन लोक मरण पावले आहेत.