मुंबई – ग्राहकांनी प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी रोख्याच्या स्वरूपात सोने खरेदी करावी यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने सुवर्ण रोखे खरेदीची योजना सुरू केलेली आहे.
या रोखे शृंखलेतील पुढील टप्प्यातील रोखे 31 ऑगस्टपासून उपलब्ध होणार असून ग्राहकांना हे रोखे चार सप्टेंबरपर्यंत खरेदी करता येणार आहेत. या सहाव्या शृंखलेतील सुवर्ण रोख्यातील सोन्याची किंमत प्रति ग्रॅमला 5,117 रुपये ठरविण्यात आली आहे. या अगोदरच्या शृंखलेतील सुवर्ण रोख्याची किंमत 5,334 रुपये प्रति ग्रॅम होती.
मात्र, दरम्यानच्या काळामध्ये सोन्याच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पुढील आठवड्यात उपलब्ध होणाऱ्या सुवर्ण रोख्यातील सोन्याची किंमत कमी करण्यात आली असल्याचे दिसून येते. या रोख्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्या ग्राहकांना प्रति ग्रॅमला 50 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. हे सुवर्ण रोखे एक ग्रॅमच्या टप्प्यात उपलब्ध असून त्यांची मुदत आठ वर्षाची आहे. मात्र, ग्राहकांना पाच वर्षांनंतर यातून बाहेर पडता येते. ही योजना फक्त भारतीय नागरिक, हिंदू अविभक्त कुटुंब, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांसाठी उपलब्ध आहे.