टोकियो – जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिल्याने तेथील सरकारसह पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनालाही धोका निर्माण झाला आहे.
करोनाच्या धोक्यामुळे यंदा होणारी ही स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे. या स्पर्धेसाठी शिंझो अबे यांनी मोठा पुढाकार घेतला होता. 2013 साली टोकियोला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले तेव्हापासूनच अबे यांनी सातत्याने या स्पर्धेसाठी तयारीच्या कार्यातही सहभाग घेतला होता.
करोनामुळे यंदा ही स्पर्धा होऊ शकत नसली तरीही त्याचे पुढील वर्षी थाटात आयोजन करण्यासाठी अबे सातत्याने कार्यरत होते. त्यांनीच राजीनामा दिल्याने आता स्पर्धेला नवे पंतप्रधान पाठिंबा देतील का व स्पर्धा बिनधोकपणे आयोजित होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.