कोथरूड, दि. 7 (प्रतिनिधी) – चांदणी चौकातील पूल पाडूनही महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम आहे. जोपर्यंत नवीन लेन तयार होत नाही, तोपर्यंत वाहतूक कोंडी फुटणार नाही. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी येथील खडक नियंत्रित स्फोटकाद्वारे फोडून नवीन लेन मोकळी करण्यात आली. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडींमध्ये अडकणाऱ्या वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी (दि. 7) संध्याकाळी वाहतूक सुरळीत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामध्ये वाहतूक पोलिसांचे मोठे योगदान आहे. दरम्यान, पुढील दहा दिवसात आणखी लेन उपलब्ध होणार असल्यामुळे महामार्गासह अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील चांदणी चौकातील पूल वाहतूक सलग अकरा तास थांबवून सुरक्षितपणे पाडण्यात आला. मात्र, वाहतूक कोंडी सुटता सुटेना, ही कोंडी फोडण्यासाठी नवीन लेनच्या कामासाठी दोनवेळा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे महामार्गासह अंतर्गत रस्त्यावर एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाली. सध्या खडक फोडण्याचे काम संपले असून, वाहतुक विभागाकडून रस्त्यावरील खडक आणि राडारोडा तत्काळ उचलण्यास सांगून आज नवीन लेन वाहतुकीसाठी खुली केली. त्यामुळे दररोजची कोंडी काहीसी कमी झाल्याचे दिसून आले.
धुळीने वाहनचालक हैराण…
चांदणी चौकातील पुलाच्या कामामुळे महामार्गावरील रस्त्यावर धुळीचे प्रमाण अधिक आहे. त्यातच दररोज खडक फोडण्याचे काम होत असल्याने चौकात आल्यानंतर रस्त्यावरील धूळ मोठ्या प्रमाणात उडते. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. धूळ एवढी पसरते की काही वेळी समोरचे काहीही दिसत नाही.
अंतर्गत रस्त्यांवर वाहने…
बावधन, बाणेर, वाकड या बाजूने शहरात आल्यास यातून पाषाण, पुणे विद्यापीठ रोड, औंध, बाणेर येथील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होत होती. स्फोटकानंतर दुपारची कोंडी कमी होत असतानाच संध्याकाळच्या वेळी पुन्हा चौकात वाहनांच्या रांगा वाढत होत्या.
चौकात उपायुक्त स्वत: उपस्थित…
महामार्गावर आज चौथी लेन सुरू झाल्यामुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. तर पाचवी लेनचे काम येत्या आठ दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे नक्कीच येथील कोंडीच प्रश्न सुटेल, असे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले. दरम्यान, महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे वाहतूक पोलीस विभाग 24 तास चौकात कार्यरत आहे. विशेषत: उपायुक्त आनंद भोईटे हे स्वत: चौकात उपस्थित राहून लेनचे काम लवकर पूर्ण कसे होईल याबाबत नियोजन सुरू आहे. त्यामुळेच आज चौथी लेन सुरू होण्यास मदत झाली.