रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 42 दिवसांवर
गंभीर रुग्णांची संख्या मात्र वाढतेय
पुणे – शहरातील करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख घटण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, शहरातील बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल 42 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे महापालिकेस दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शहरातील गंभीर रुग्णांचा टक्का वाढतच असून सक्रिय बाधितांमध्ये सुमारे 5 टक्के रुग्ण गंभीर असल्याने तसेच मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचा आकडा दिवसाला 30 पेक्षा अधिक असल्याने प्रशासनाच्या अडचणीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.
शहरातील लॉकडाऊनच्या काळात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 22 दिवसांपेक्षा जास्त होता. त्यानंतर तो जुलैच्या मध्यापर्यंत 13 दिवसांपर्यंत खाली आला होता. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरातील करोनाबाधितांचा आकडा कमी होण्यास सुरुवात झाल्याने हा कालावधी 20 दिवसांवर आला होता.
तर सध्याची एकूण रुग्णसंख्या आणि दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा लक्षात घेता हा कालावधी सुमारे 42 दिवसांवर गेला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.