नवी दिल्ली – रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांची मालमत्ता शंभर अब्ज डॉलर्सच्या जवळपास आली आहे. गेले काही दिवस शेअरबाजारात रिलायन्सच्या शेअर्सचे भाव सुमारे चार टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये त्यांच्या मालमत्तेचे मूल्य एकाच दिवसात 3.7 अब्ज डॉलर्सने वाढले आहे.
त्यामुळे आता त्यांची एकूण मालमत्ता 92.60 अब्ज डॉलर्स पर्यंत गेली आहे. वॉरेन बफे याची मालमत्ता 102.6 अब्ज डॉलर्स इतकी असून त्यांच्या इतकी मालमत्ता करण्यास मुकेश अंबानी यांना आता केवळ 10 अब्ज डॉलर्सचा पल्ला गाठणे बाकी आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये रिलायन्स शेअर्सच्या किंमती 4.15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अंबानी उद्योग समूहाची जिओ ही टेलिकॉम कंपनी ही या क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी बनली आहे. डिजीटल क्षेत्रातही रिलायन्सचा दबदबा वाढला आहे. सौदी अरेबियाची आर्मको ही कंपनी रिलायन्सच्या पेट्रोकेमिकल उद्योगात सुमारे 25 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
त्यामुळे रिलायन्सचा पेट्रोकेमिकलचा धंदाहीं बराच विस्तारणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे रिलायन्सच्या शेअरचा भाव शुक्रवारी ऑल टाईम हायच्या पातळीवर म्हणजेच 2395 पर्यंत पोहचला होता. अंबानी यांनी अलीकडेच 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक क्लीन एनर्जी क्षेत्रात करण्याची घोषणाही केली आहे.