आयुष्मान खुरानाचा “शुभ मंगल ज्यादा सावधान’ आता पूर्वी जाहीर केलेल्या तारखेलाच म्हणजे 21 फेब्रुवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. होमोसेक्युऍलिटी आणि त्याच्याशी संबंधित निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयावरचा हा सिनेमा पूर्वी याच तारखेला रिलीज होणार असे ठरवले गेले होते.
नंतर ही रिलीज डेट बदलून 13 मार्च करण्यात आली होती. मात्र आता आयुष्मानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरूनच ही नवी तारीख जाहीर केली आहे. “भागते भागते आ रहे है हम’ असे आयुष्मानने म्हटले आहे. “… ज्यादा सावधान’मध्ये नीना गुप्ता आणि गिरीराज राव हे देखील असणार आहेत.
या दोघांबरोबर आयुष्मानने “बधाई हो’मध्ये एकत्र काम केले होते. “शुभ मंगल सावधान’ 2017 साली रिलीज झाला होता. त्याचाच सिक्वेल असलेल्या “शुभमंगल ज्यादा सावधान’मध्ये आयुष्मान आणि जितेंद्र कुमार हे दोघे एकमेकांप्रती आकर्षित झालेले दिसणार आहेत.
प्रेम आणि संस्कार या कात्रीत अडकलेल्या तरुणाची कथा आता तीन आठवडे आगोदरच पडद्यावर येणार आहे. सप्टेंबर महिन्यातच आयुष्मानने आपल्या रोलच्या कामाला सुरुवात केली होती.