गणेश घाडगे
ग्रामीण व हायवेवरील पंपावर धक्कादायक प्रकार; मापात पाप, वाहनचालकांना आर्थिक फटका
नेवासे – एकीकडे गगनला भिडणाऱ्या पेट्रोलच्या किमती आणि दुसरीकडे विविध कंपन्याच्या पेट्रोल पंपावर विश्वासाने पेट्रोल भरणारे वाहन चालक अशी स्थिती असताना काही पेट्रोल पंपावर मात्र मापात पाप होत असल्याने त्यांचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना बसत आहे. पेट्रोलचे मीटर पळत पण त्याप्रमाणात टाकीत पेट्रोल पडते की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे. ग्रामीण भागासह राज्य व महामार्गावरील पेट्रोल पंपावर सर्रास पेट्रोल मारण्याचा प्रकार होत असून त्याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून होत आहे.
50 रुपयाचे पेट्रोल टाकूनही काही पॉइंट पेट्रोल कमी पडत असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांतून व्यक्त होत आहे. संतप्त ग्राहकांचे अनेकदा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याशी खटके उडतात, मात्र यांच्या विरोधात दाद मागायची कुठे? हा प्रश्न अनुउत्तरीत असल्याने व चोरी पकडताना द्रविडी प्राणायाम करण्यास कोणालाही वेळ नसल्याने पेट्रोल पंपावरील चोरी अव्याहत सुरु आहे. नेवासा शहरात जवळपास दहा ते बारा नेवासा – शेवगाव राज्यमार्गावर 4 – 5 अहमदनगर – औरंगाबाद महामार्गवर 50 – 70, सोनई परिसरात देखील 7 – 8 पेट्रोल पंप, कुकाणा परिसरात 2 पंप आहेत.यापैकी जवळपास सर्वच पंप कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असतात. मालक केवळ सकाळी व संध्याकाळी येऊन हिशोब घेतात. त्यानंतर मात्र राज्य कार्मचाऱ्यांचेच असते.
पंपावर कमी पगार मिळत असला तरी दररोजच्या पेट्रोल चोरीतून होणारी कमाई मोठी असल्याने अनेकजण पंपावर काम करण्यास उत्सुक असतात, मात्र मालक ओळखीच्या व विश्वासू लोकांनाच काम करण्याची संधी देतात. काही पंपावरील पेट्रोल चोरीबाबत अनेकदा तक्रारी होतात. मात्र, त्याची दखल घेण्यात येत नसल्याने हा धंदा चांगलाच बहरला आहे.
काही पंपचालकाच्या मोटारी एअर पकडत असल्याने मीटरचे काटे फिरत असले तरी टाकीत पेट्रोल पडत नाही. काही पंपावर मीटरमध्ये चीप बसविल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून होत आल्या आहेत. मीटर जरी योग्य दाखवीत, असले तरी ग्राहकांना सात ते आठ पॉइंटचा फटका चीपमुळे बसतो. काही वेळा कर्मचारी पेट्रोल टाकताना नोबला झटके मारून पेट्रोल टाकत असल्याने मीटर जम्प करीत पळते. काही कर्मचारी तर 100 ते 50 रुपयांचे टाकण्याचे सांगितल्यास काही पैशाचे पेट्रोल ग्राहकाच्या डोळ्यादेखत कमी टाकून दिवसभर प्रत्येक ग्राहकांना 30 ते 40 पैशाचा चुना लावून स्वतःची तुंबडी भरताना दिसतात. चुकून एखादी तक्रार कंपनीपर्यंत पोहचल्यास कंपनीचे एरिया व रिजनल मॅनेजर पंपावर ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकातून होतो. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पंप तपासणीसाठी मर्यादित अधिकार असल्याचे सांगितले जाते.
सूर्य आग ओकत असल्याने गाडीच्या झाकणातून व उन्हाच्या तिव्रतेने पेट्रोल आपोआप कमी होत असल्याने दररोज वाहनचालकाला पंपावर जावेच लागते, मात्र या ठिकाणी सरळ – सरळ लुटत असल्याचा प्रकार डोळ्यादेखत सुरु असून देखील कुणीच काहीच आवाज उठवत नसल्याने नागरिकांची आर्थिक लुट कधी बंद होणार असाच प्रश्न उपस्थित होत आहे. वाहन टाकीत पेट्रोल टाकताना चालकाची नजर फक्त शून्य आकड्यावर असते. मापातील पाप त्यांच्या लक्षात येत नाही.