नवी दिल्ली : लोकसभेच्या वेबसाईटवरून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या व्यक्तीगत माहितीतील काही भाग वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिर्ला हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि राम जन्मभूमी चळवळीत त्यांना अटक करण्यात आली होती, हा उल्लेख असणारा परिच्छेद वगळण्यात आला आहे.
यापुर्वी लोकसभेच्या वेबसाईटवर बिर्ला यांच्या माहितीमध्ये ते रा. स्व. संघाशी संबंधित असल्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला होता. मात्र त्याच्या संपादीत भागात हा उल्लेख वगळण्यात आला आहे. रामजन्मभूमी आंदोलनातील सक्रिय सहभागाबाबत त्यांना उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली होती. असाही उल्लेख पुर्वीच्या परिचयात होता. मात्र आता तो वगळण्यात आला आहे. नव्या परिचयात त्यांनी खासदार म्हणून केलेली मानवतावादी आणि चांगल्या कामांचाच केवळ उल्लेख ठेवण्यात आला आहे.
या बदलावरून आता बिर्ला यांच्यावर टीका होऊ लागली आहे. भाजपातून कॉंग्रेसमध्ये आलेल्या एका नेत्याने म्हटले आहे की, रा. स्व संघाशी असणाऱ्या जवळकीपेक्षा त्याच्याकडे आहे काय? कोणत्या मुद्द्यावर त्यांनी भूमिका घेतली? केवळ स्वयंसेवक म्हणून एवढ्या उच्च पदावर ते विराजमान झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असणारी जवळीक आणि त्यांचा जुळवून घेण्याचा स्वभाव यामुळे त्यांना ही संधी मिळाली. कोणत्याही नेत्यांनी त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेले मोदी यांना आवडत नाही, असे ते म्हणाले.